पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्याचा निषेध करत अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यातच आता सलमान खाननेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
salman khan
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 29, 2025 | 12:29 PM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्याच वेळी, दहशतवादी घटनेनंतर सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी दुःख व्यक्त करत या हल्ल्याचा निषेधही केला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे आगामी कार्यक्रम आणि शो रद्द केले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय

आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननेही एक मोठा निर्णय घेतला आहे. सलमान खानच्या या निर्णयाबद्दलची एक पोस्टही शेअर केली आहे. त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सलमान खानने मे महिन्यात होणारा त्याचा युके दौरा पुढे ढकलला आहे. सलमानने एक पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती दिली. या दौऱ्यात त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार होते. सलमान खानने पोस्ट करत म्हटलं आहे की, “काश्मीरमधील अलिकडच्या काळात घडलेल्या दुःखद घटना लक्षात घेऊन आणि जड अंतःकरणाने, आम्ही 4 आणि 5 मे रोजी मँचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा ‘द बॉलिवूड बिग वन शो यूके’ पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. आम्हाला माहित आहे की आमचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.”

जड अंतःकरणाने….

सलमान खानने पुढे लिहिले की, “या दुःखद काळात शो पुढे ढकलणे हा योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करत आहोत आणि तुमच्या पाठिंब्याची आणि समजुतीची आम्ही प्रशंसा करतो. या शोच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” असं म्हणत त्याने या हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.


दहशतवादी हल्ल्याबद्दल सलमान खानचा संताप

दहशतवादी हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने एक पोस्ट शेअर करून आपला संतापही व्यक्त केला होता. ‘पृथ्वीवरील स्वर्ग असलेले काश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे, त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. एका निरपराध व्यक्तीलाही मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखे आहे.’

सलमान खानच्या ‘द बॉलिवूड बिग वन शो यूके’ बद्दल बोलायचे झाले तर, या दौऱ्यात माधुरी दीक्षित, वरुण धवन, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, सारा अली खान, कृती सेनन, मनीष पॉल आणि सुनील ग्रोव्हर त्याच्यासोबत परफॉर्म करतील.