Salman Khan: माझ्या कुटुंबाला धोका…, सलमान खान पहिल्यांदाच बोलला

Salman Khan: कधी जीवेमारण्याची धमकी, तर कधी जीवेमारण्याचा ई-मेल... गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेला गोळीबार... पहिल्यांदा सलमान खान याने दिलेली संपूर्ण प्रतिक्रिया समोर..., सध्या सर्वत्र सलमान खान याच्या वक्तव्याची चर्चा...

Salman Khan: माझ्या कुटुंबाला धोका..., सलमान खान पहिल्यांदाच बोलला
सलमान खान
| Updated on: Jul 24, 2024 | 4:00 PM

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. 14 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. शिवाय या घटनेची जबाबदारी देखील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली. आता 14 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेवर, अनेकदा भाईजानला आलेल्या मारण्याच्या धमक्या, कुटुंबियांच्या जीवाला धोका… यावर अभिनेता सलमान खान पहिल्यांदा बोलला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याने पहिल्यांदा घडलेल्या सर्व घटनांचा खुलासा केला आहे.

काय म्हणाला सलमान खान?

मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबत सलमान खान म्हणाला, ‘मी एक प्रोफेशनल फिल्म स्टार आहे. मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या 35 वर्षांपासून काम करत आहे. वांद्रे येथील बँडस्टँड येथे माझं एक घर आहे. घराबाहेर कायम माझ्या चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली असते. चाहत्यांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी देखील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या माझ्या घराच्या बालतनीतून चाहत्यांना भेटतो…’

‘माझ्या घरी जेव्हा पार्टी असते, तेव्हा माझे कुटुंबिय, मित्र, आई – वडिल सर्व जण वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असतात. काम झाल्यानंतर देखील मी बालकनीत येतोत, सकाळी उठल्यानंतर मी बालकनीत येतो. शुद्ध हवेत काही वेळ व्यतीत करतो. मी स्वतःसाठी सुरक्षेचा देखील बंदोबस्त केला आहे.’

‘2022 माझ्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. माझ्या वडिलांना एक पत्र मिळालं होतं. पत्रात माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देण्यात आली होती… मार्च 2023 मध्ये माझ्या अधिकृत ई-मेल आयडीवर एका कर्मचाऱ्याला मेल आला होता. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने मला आणि माझ्या कुटुंबाला जीवेमारण्याची धमकी दिली होती. यासंबंधी माझ्या टीमने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.’

‘याच वर्षी जानेवारी महिन्या दोन लोकांनी खोट्या ओळखीवर माझ्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पनवेल पोलीस स्थानकात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दोन्ही गुन्हेगार राजस्थान येथील असल्याची माहिती मला पोलिसांनी दिली. तेव्हा मी माझ्या सर्व कुटुंबियांना सतर्क राहाण्यासाठी सांगितलं होतं.’

‘मला मुंबई पोलिसांनी Y प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. माझ्यासोबत ट्रेंड पोलीस कर्मचारी, बॉडीगार्ड, खासगी बॉडीगार्ड असतात.. 14 एप्रिल 2024 मध्ये मी आणि कुटुंब झोपललं असताना सकाळी 4.55 वाजता माझ्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. याघटनेची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली. मी ठामपणे सांगू शकतो की बिश्नोई गँगने माझ्या घरावर गोळीबार केला..’

‘याआधी देखील लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई गँगने एका मुलाखतीत मला आणि माझ्या कुटुंबियांनी जीवेमारण्याची धमकी दिली. मला आणि माझ्या कुटुंबियांना मारण्यासाठी बिश्नोई गँगचा प्रयत्न होता.. हे मला माहिती आहे…’ पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटवर सलमान खान याने सही देखील केल्याची माहिती मिळत आहे.