
बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता सलमान खानशी पंगा घेऊ नये, असं म्हटलं जातं. परंतु ‘दबंग’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने फक्त सलमानच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी पंगा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. आता सलमानने त्याला सडेतोड उत्तर देत अभिनवला खोचक प्रश्न विचारला आहे. ‘बिग बॉस 19’च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये स्टँडअप कॉमेडियन रवी गुप्तासोबत बोलताना सलमानने अभिनववर निशाणा साधला. रवी गुप्ताने सलमानचं कौतुक करत म्हटलं, “जो जगासमोर आली चूक कबुल करतो, त्याला सलमान खान म्हणतात.”
रवी गुप्ताला उत्तर देताना सलमान म्हणतो, “कामावरून आठवलं की आमच्याकडे आणखी एक दिग्दर्शक आहे. दबंग माणूस, माझ्यासोबत त्याने आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यावरही निशाणा साधला आहे. गेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये मी सहज म्हटलं होतं की, काहीतरी काम कर, तुझं बोलणं ऐकण्यात कोणालाच रस नाही. आता मी त्याला विचारू इच्छितो की, काम मिळालं का भावा? तू प्रत्येकाबद्दल वाईट बोलणार का? तू जी नावं घेतली आहेस, ती लोकं आयुष्यात कधी तुझ्यासोबत काम करणार नाहीत. त्यांच्याशी जे लोक जोडलेले आहेत, तेसुद्धा करणार नाहीत.”
सलमान पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही तुला दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा तू नकार दिलास. जे कौतुक केलं जात होतं, ते सर्व तू गमावलंस. मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की तू स्वत:लाच उद्ध्वस्त केलंस. जर एखाद्याच्या कुटुंबामागे लागायचं असेल तर स्वत:च्या कुटुंबामागे लाग. तुझ्या भावाच्या मागे लाग, त्याच्यावर प्रेम कर. आई-वडील, पत्नी आणि मुलांवर प्रेम कर. एवढं तर तू करूच शकतोस. त्यांना तुझी चिंता वाटत असेल. जर कोणी तुम्हाला सल्ला देत असेल तर विचार करून बोलत जा. मला तुला पुढे जाताना पहायचं आहे. तू खूप प्रतिभावान आहेस, चांगलं लिहितोस. या चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस.”
सलमानच्या या वक्तव्यानंतर रवी गुप्ता मस्करीत त्याला म्हणतो, “या एपिसोडनंतर त्यांची आणखी एक मुलाखत येईल.” तेव्हा सलमान म्हणतो, “येईलच. देव तुझ्यासाठी ते करेल आणि मित्रा तू मला माझ्या गुडघ्यावर काय आणशील, मी दररोज सकाळी फक्त देवासमोर गुडघे टेकतो.” अभिनव कश्यपने सलमानवर बरीच टीका केली होती. सलमान गुंड आहे, तो जामिनावर बाहेर आहे, असं तो म्हणाला होता. तर शाहरुख खानने दुबईला जावं, तो समाजाकडून फक्त घेत असतो, बदल्यात देत काहीच नाही, अशी टीका अभिनवने केली होती.