एक्सला महागड्या भेटवस्तू दिल्याचा समंथाला पश्चात्ताप; आता म्हणाली ‘युजलेस’!

समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. नाग चैतन्यला दिलेल्या महागड्या गिफ्ट्सबद्दल समंथाने पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

एक्सला महागड्या भेटवस्तू दिल्याचा समंथाला पश्चात्ताप; आता म्हणाली युजलेस!
Samantha and Naga Chaitanya
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2024 | 1:38 PM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या दोघांनी विविध प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली. यावेळी ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये दोघांनी एकमेकांना रंजक प्रश्न विचारले. वरुणने समंथाला विचारलं, “एखाद्या फालतू गोष्टीसाठी तू सर्वांत जास्त खर्च केलं असशील, अशी गोष्ट कोणती?” त्यावर समंथाने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

“तू सर्वाधिक पैसा खर्च करून कोणती निरुपयोगी गोष्ट घेतलीस”, असा प्रश्न विचारल्यावर समंथा म्हणते, “माझ्या एक्सच्या (एक्स बॉयफ्रेंड/पती) महागड्या भेटवस्तूंसाठी.” यावरून समंथाला तिचा पूर्व पती नाग चैतन्यला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल पश्चात्ताप वाटत असल्याचं नेटकरी म्हणाले. समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये हे दोघं विभक्त झाले. समंथाला घटस्फोट दिल्याच्या तीन वर्षांनंतर आता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिच्याशी तो दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. यावर उपचार घेण्यासाठी तिने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा कामावर परतली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आई होण्याचीही इच्छा बोलून दाखवली. “मला वाटत नाही की या गोष्टीला उशीर झाला आहे. आई होण्याची स्वप्नं माझी अजूनही आहेत. अर्थातच मला आई व्हायला आवडेल. मला नेहमीच आई होण्याची इच्छा होती. तो खूप सुंदर अनुभव असेल. मी याबद्दल नक्कीच विचार करेन. लोक नेहमीच वयाबद्दल काळजी व्यक्त करतात. पण माझ्या मते आई होण्यासाठी असा काही निश्चित वेळ लागत नाही”, असं समंथा म्हणाली होती.

मायोसिटीस म्हणजे काय?

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us