Adinath Kothare: ‘भरत मिलाप’चा सीन करताना आदिनाथ कोठारेला आला असा अनुभव; म्हणाला ‘खरोखर चित्रकूट जंगलात..’
Adinath Kothare: मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेनं 'रामायण' या बिग बजेट चित्रपटात भरतची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथ शूटिंगच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

Adinath Kothare: बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्यातील कलाकार, भव्य सेट आणि कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे याच्यावर भरताची महत्त्वपूर्ण भूमिका सोपवण्यात आली आहे. आता आदिनाथने या चित्रपटातील एका खास प्रसंगाचा अनुभव सांगितला आहे. ‘भरत मिलाप’ या भावनिक प्रसंगाचं चित्रीकरण करताना आपण खरोखरच चित्रकूटच्या जंगलात असल्याचा भास झाल्याचं त्याने म्हटलं आहे.
‘भरत मिलाप’च्या सीनबद्दल काय म्हणाला आदिनाथ?
आदिनाथ कोठारेने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव शेअर केले. विशेषतः भरत मिलापच्या प्रसंगाचं शूटिंग त्याच्यासाठी अत्यंत भावनिक आणि खास होतं. या चित्रपटासाठी अयोध्या आणि चित्रकूटचा संपूर्ण परिसर सेटवर उभारण्यात आला होता. त्याची भव्यता आणि बारकाव्यांसह केलेली सजावट पाहून आदिनाथ भारावून गेला. या अनुभवाबद्दल सांगताना आदिनाथ म्हणाला, “नितेश सरांनी संपूर्ण जग ज्या पद्धतीने उभं केलं, सेटवरील प्रत्येक गोष्टीचा विचार केला, ते अविश्वसनीय होतं. भरत मिलापच्या प्रसंगाचं चित्रीकरण करताना मला खरंच चित्रकूटच्या जंगलात असल्यासारखं वाटलं.”
View this post on Instagram
पुढे त्याने सेटवरील एका छोट्याशा पण महत्त्वपूर्ण गोष्टीचाही उल्लेख केला. जंगलातून सतत लोकांची ये-जा झाल्यानंतर गवतावर तयार होणारी पायवाटही सेटवर अगदी तशीच तयार करण्यात आली होती. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे चित्रपटातील जग अधिक वास्तववादी वाटतं, असं त्याने सांगितलं.
सेटवरचा अनुभव
आदिनाथने सांगितलं की, सेटवर प्रवेश केल्यानंतर त्याला आपण भरताची भूमिका साकारत आहोत, याची जाणीवच वेगळ्या पद्धतीने झाली. समोर असलेल्या कलाकारांकडे सहकलाकार म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्याशी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण म्हणून संवाद साधत असल्याची भावना निर्माण झाली होती. संपूर्ण सेटवरील वातावरणामुळे तो आपल्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप झाला होता.
ऑडिशन देणं प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचं
या मुलाखतीत आदिनाथने ऑडिशन प्रक्रियेबद्दलही आपलं मत मांडलं. अनुभवी कलाकारांनी ऑडिशन देऊ नये, ही चुकीची समजूत असल्याचं त्याने म्हटलं. केवळ कलाकाराचा चेहरा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, तर त्यांना चांगली कथा पाहायची असते. त्यामुळे योग्य भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड होणं महत्त्वाचं आहे. मोठे कलाकारही ऑडिशन देतात, असं त्याने स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘रामायण’ हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. यात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओलसह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग 2028 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आदिनाथच्या या अनुभवामुळे आता पडद्यावर भरत मिलापचा प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
