Adinath Kothare: आदिनाथ कोठारेनं ‘रामायणा’त भरत नव्हे तर ‘या’ मोठ्या भूमिकेसाठी दिली होती ऑडिशन
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे आणि आदिनाथ कोठारे असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेसोबतच कलाकारांच्या निवडीमागच्या रंजक गोष्टींमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ramayana: मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या भव्य सिनेमात आदिनाथ प्रभू श्रीरामांचे धाकटे बंधू भरत यांची भूमिका साकारत आहे. मात्र, या भूमिकेसाठी त्याची थेट निवड झाली नव्हती. विशेष म्हणजे, आदिनाथने सुरुवातीला दुसऱ्याच भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी त्याला पुन्हा फोन आला आणि त्याच्या वाट्याला भरताची भूमिका आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने हा संपूर्ण प्रवास उलगडला आहे.
कोणत्या भूमिकेसाठी दिली होती ऑडिशन
आदिनाथने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘रामायण’साठी त्याने सुरुवातीला लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. या ऑडिशनमध्ये त्याला सीतेला वनातील कुटीतच थांबण्याची विनंती करणाऱ्या लक्ष्मणाचा प्रसंग सादर करायचा होता. सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मण तिला कुटीच्या बाहेर न जाण्याची सूचना देतो, असा हा प्रसंग होता. या ऑडिशनचा उद्देश केवळ लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी कलाकार शोधणं एवढाच नसावा, असं आदिनाथला वाटतं. कारण राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चारही भाऊ पडद्यावर एकाच कुटुंबातील असल्यासारखं दिसणंही महत्त्वाचं होतं. त्यामुळे कलाकारांची निवड करताना त्यांच्यातील साम्य आणि पडद्यावरची केमिस्ट्री तपासली जात असावी, असं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
सहा महिन्यांनी आला फोन अन् मिळाली भरताची भूमिका
लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर आदिनाथला जवळपास सहा महिन्यांनी फोन आला. त्याला शॉर्टलिस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र, अखेर त्याची निवड भरताच्या भूमिकेसाठी झाली. ही भूमिका मिळणं त्याच्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण होता. रामायण ही केवळ एक कथा किंवा चित्रपट नसून भारतीयांच्या मनात रुजलेली परंपरा आणि मूल्ये आहेत. अशा महत्त्वाच्या व्यक्तिरेखेला साकारण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्य असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
आदिनाथने या मुलाखतीत ऑडिशन प्रक्रियेबाबतही महत्त्वाचं मत मांडलं. अनुभवी कलाकारांनी ऑडिशन देऊ नये, असा समज चुकीचा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. एखाद्या भूमिकेसाठी अनेक उत्तम कलाकार योग्य असू शकतात; मात्र त्या व्यक्तिरेखेला नेमका कोणता कलाकार न्याय देऊ शकेल, हे ठरवण्यासाठी ऑडिशन आवश्यक असते, असं त्याचं म्हणणं आहे. कलाकार कितीही अनुभवी असला तरी त्याने नव्या संधींसाठी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. ऑडिशनमधून भूमिका मिळाली नाही तरी आपली कला दाखवण्याची संधी मिळते आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी कास्टिंग दिग्दर्शकांच्या लक्षात राहता येतं, असंही त्याने सांगितलं.
रणबीर कपूरसोबत शाळेपासूनच आहे खास कनेक्शन
या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. विशेष म्हणजे, आदिनाथ आणि रणबीर दोघंही मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकले आहेत. रणबीर आपल्यापेक्षा सिनियर होता आणि शाळेत त्याला पाहिल्याची आठवणही आदिनाथने सांगितली. अनेक वर्षांनंतर त्याच्यासोबत एका भव्य चित्रपटात काम करण्याचा अनुभव त्याच्यासाठी खास ठरला आहे.
