लोकांना तू पर्सनल लाइफमध्ये कसा आहेस..; अक्षय केळकरसाठी समृद्धी केळकरची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री समृद्धी केळकरने अक्षय केळकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. आपलं नातं खरंतर आपल्यालाच माहीत.. असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

लोकांना तू पर्सनल लाइफमध्ये कसा आहेस..; अक्षय केळकरसाठी समृद्धी केळकरची पोस्ट चर्चेत
समृद्धी केळकर आणि अक्षय केळकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2025 | 1:46 PM

अभिनेत्री समृद्धी केळकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेता आणि तिचा खास मित्र अक्षय केळकरसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. अक्षयसोबतचे काही फोटो पोस्ट करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट लिहिण्यामागचं कारण म्हणजे अक्षयचा वाढदिवस. समृद्धीच्या आयुष्यात अक्षयचं काय महत्त्व आहे, हे पोस्ट वाचल्यानंतर सहज लक्ष येतं. ‘लोकांना तू इंडस्ट्रीत कसा आहेस, पर्सनल लाइफमध्ये कसा आहेस, वगैरे काहीही, कसंही वाटू दे… आम्हाला माहीत आहे अक्षय केळकर कसा आहे?,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. समृद्धीच्या या पोस्टवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिली आहे.

समृद्धी केळकरची पोस्ट-

‘आपलं नातं खरंतर आपल्यालाच माहीत, कारण लोकांनी आपल्याला कलाकार म्हणून ओळखण्या आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो. काय, कसं, केव्हा याची उत्तरं काही महत्वाची नाहीत. महत्वाचं काय आहे ती म्हणजे आपली मैत्री. जी आधीही होती आजही आहे आणि कायम असणार आहे. अभिनय क्षेत्रातली माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन ही तू म्हणालास म्हणून दिलेली आणि त्याच ऑडिशन, मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. तेव्हापासून आजवर पुन्हा कधी मागे फिरायचा विचार केला नाही आणि जेव्हा कधी तो आला तेव्हा माझ्या आधी तू त्याला पळवून लावलंस.’

‘मित्र कितीही प्रेमळ असला तरीही तो कर्तृत्ववान असला तर अभिमान थोडा जास्त असतो. तू आजवर हिंदी सिरीअल्स, बिग बॉस, मराठी सिरीअल, चित्रपट असं बरंच कमाल कमाल काम केलं आहेस. पण त्याहूनही बऱ्याच जणांना जे जमत नाही असं मुंबईत स्वतःचं घर, गाडी एकूण सगळंच करून मोकळा झाला आहेस. याचा तुझी जवळची हक्काची मैत्रीण म्हणून प्रचंड अभिमान वाटतो. लोकांना तू इंडस्ट्रीत कसा आहेस, पर्सनल लाइफमध्ये कसा आहेस, वगैरे काहीही, कसंही वाटू दे… आम्हाला माहीत आहे अक्षय केळकर कसा आहे?’

‘शिवराळ असलास तरी माझ्या बाबांनंतर मला समजून घेणारा, मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारा, आय अॅम जस्ट अ कॉल अवे (फक्त एक कॉल केलंस तरी लगेच मदतीला धावून येणारा) या वाक्याला प्रत्येक वेळी खरं ठरवणारा, काळजी घेणारा माणूस, मित्र अजून कोणी भेटला नाही. एवढ्या वर्षांची ओळख पण खूप कमी काम केलं एकत्र. येणाऱ्या वर्षांत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करूच. आता लवकरच तुझा नवीन चित्रपट येतोय, त्यासाठी तुला कमाल भरभरून शुभेच्छा आणि या सगळ्यासोबत वाढणाऱ्या वयाची आठवण करून देणाऱ्या तुझ्या वाढदिवसाच्याही तुला अनंत शुभेच्छा. या वर्षी मी नक्की तुला डान्स शिकवणार. प्रॉमिस. बाकी तू कमाल आहेस आणि कायम तसाच कमाल रहा,’ अशा शब्दांत समृद्धी व्यक्त झाली आहे.

समृद्धीच्या पोस्टवर अक्षयने लिहिलं, ‘भाई प्रेम आहेस तू. भांडण आपल्या रक्तात आहे, त्यामुळे आपण भांडत पण राहुयात.. सगळ्या गोष्टींसाठी. आय लव्ह यू.. मी फक्त तुझाच आहे. बाकी शेवटचं प्रॉमिस या जन्मात तुला शक्य नाही. ओळखतो गं मी तुला, तुला वाटत नसलं तरी.’ समृद्धीची ही पोस्ट आणि त्यावर अक्षयची कमेंट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.