
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संबंधित हिजाबचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. ‘दंगल’ फेम झायरा वसीमपासून राखी सावंतपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता सना खाननेही नितीश कुमार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मुस्लीम महिला डॉक्टरचा हिजाब काढल्याप्रकरणी तिने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याप्रकरणी सनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. नितीश कुमार यांचं वागणं पाहून त्यांच्या दोन कानाखाली वाजवण्याची माझी इच्छा होती, असं ती थेट या व्हिडीओत म्हणाली.
या व्हिडीओमध्ये सना म्हणते, “काही दिवसांपूर्वी आमच्या हिजाब घातलेल्या बहिणीचा हिजाब म्हणजेच नकाब, जो तिचा चेहरा झाकत होता, आपल्या एका आदरणीय राजकारण्याने तिला प्रमाणपत्र देताना, त्यांच्या मनात काय आलं काय माहीत पण तिचा चेहरा पाहणं त्यांना सर्वांत गरजेचं वाटलं आणि त्यानंतर त्यांनी थेट तिचा नकाब ओढला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या मागे जे लोक होते, ते गाढवासारखे हसत होते.”
“व्हिडीओ पाहून मला वाटत होतं की मी त्यांच्या दोन कानाखाली वाजवावी. ती गोष्ट पाहून मला इतका राग आला. कोणालाही राग येणं स्वाभाविक आहे. आज जेव्हा आपण आपल्या सुरक्षेविषयी बोलतो, आंदोलनं करतो, कँडल मार्च करतो, हे सर्व आपण कशासाठी करतोय? कारण या सरकारने मुलींच्या सुरक्षेसाठी काहीतरी करावं अशी आपली मागणी आहे”, अशा शब्दांत ती संताप व्यक्त करते.
ही घटना 1000 हून अधिक आयुष डॉक्टरांच्या नियुक्ती पत्र वितरण समारंभात घडली होती. डॉ. नुसरत परवीन ही मुस्लीम तरुणी स्टेजवर हिजाब घालून आली होती. तेव्हा तिला नियुक्ती पत्र देताना मुख्यमंत्री नितीश कुमार तिच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढताना दिसतात. यामुळे ती तरुणी गोंधळते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
दंगल चित्रपटात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित नितीश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली. ‘महिलांची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार ही खेळणी नाहीत, ज्यांच्याशी खेळता येईल. विशेषत: सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. एक मुस्लीम महिला म्हणून दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे काढून टाकण्यात आल्याचं आणि त्यावर बेफिकीरपणे हसतानाचं पाहणं ही अत्यंत संतापजनक बाब आहे. सत्ता सीमा ओलांडण्याची परवानगी देत नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागावी’, असं तिने लिहिलं होतं.