ती कचऱ्याचा डबा, विचार गटारासारखे..; माही विजबद्दल अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट? वाचून चाहतेही हैराण
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सना मकबूलने सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट लिहिली असून त्यातून तिने अभिनेत्री माही विजवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. ती डस्टबिन आणि गटार आहे, अशा शब्दांत सनाने टीका केला आहे.

टीव्ही आणि सोशल मीडिया विश्वात अभिनेत्री सना मकबूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता तिच्या एका अप्रत्यक्ष पोस्टमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टचा संबंध अभिनेत्री माही विज हिच्याशी असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सनाने तिच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. सनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने ‘कचरा’ आणि ‘डस्टबिन’ यांचा संदर्भ देत अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी लगेचच माही विजसोबत याचा संबंध जोडण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर दोन्ही अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होऊ लागली.
सनाच्या पोस्टमध्ये काय?
‘आयुष्याची गंमतच आहे. माझी एक एक्स-फ्रेंड (पूर्व मैत्रीण) लोकांकडे जाऊन माझी बदनामी करत आहे. मी काय म्हटलं, तिने काय म्हटलं, वगैरे वगैरे.. पण डार्लिंग, मी जर माझं तोंड उघडलं, तर तू सध्या स्वतःची जी प्रतिमा निर्माण करण्याचा खूप प्रयत्न करत आहेस, त्याच्या आसपासही उभी राहू शकणार नाहीस. (जी एका बिचारी आणि अबला नारीची आहे.) ती स्वतः मात्र ‘डस्टबिन’ (कचऱ्याचा डबा) आहे. तिला चुकीच्या गोष्टी सांगून भडकवलं जात आहे. देव तिचं भलं करो. तिची विचारसरणीच गटारासारखी आहे. त्यामुळे मला डिवचू नका किंवा माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. मी शांत आहे कारण मला शांत राहणं पसंत आहे, माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही म्हणून नाही. तुम्ही सुरू केलेल्या अनावश्यक ड्रामा आणि खेळात मला अडकायला अजिबात आवडणार नाही,’ अशी पोस्ट सनाने लिहिली आहे.
या पोस्टमध्ये तिने एक टीपसुद्धा लिहिली आहे. ‘हे कसंही करून तुझ्यापर्यंत पोहोचलं, तर तुझ्याबद्दल आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे,’ असं तिने त्यात म्हटलंय. इतकंच नव्हे तर ‘चोराच्या उलट्या बोंबा.. या म्हणीचं तू अगदी योग्य उदाहरण आहेस. बिग बॉस 20 साठी एकदम योग्य उमेदवार. मला कोणाच्या पाठीमागे बोलायला आवडत नाही. जे काही आहे ते समोर येऊन बोलायला आवडतं,’ अशाही शब्दांत तिने संताप व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सनाची पोस्ट समोर आल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी तिचा संबंध माही विजसोबत जोडला. माही ही एकेकाळी सना मकबूलची जवळची मैत्रीण होती. एकाने लिहिलं, ‘मला वाटतं माही विज.. कारण दोघी एकेकाळी जवळच्या मैत्रिणी होत्या आणि आता बिग बॉस 20 साठी स्पर्धक म्हणून माहीच्या नावाचीही चर्चा होत आहे.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘मी आताच तपासून पाहिलं तर दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलं आहे.’
दरम्यान, माही विजने या पोस्टवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे दोन्ही अभिनेत्रींच्या दरम्यान खरंच काही वाद आहे की ही केवळ सोशल मीडिया युजर्सचा अंदाज आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.