Gold Loan : सोनं स्वस्त झाल्यानं गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यां टेन्शनमध्ये, RBI ने उचललं मोठं पाऊल!
ग्राहक आपल्याकडे असलेलं सोन गहाण ठेवून त्या बदल्यात कर्जाच्या रुपात पैसे घेतात. परंतु सोन्याचा भाव घसरल्यावर गहाण ठेवलेल्या सोन्याचे मूल्य कमी होते. दुसरीकडे कर्ज म्हणून दिलेली रक्कम मात्र कमी होत नाही.

Gold Loan And Gold Price : सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय. गेल्या दोन महिन्यांची तुलना करायची झाल्यास सोनं आजघडीला खूपच स्वस्त झालंय. सोन्याचा भाव गडगडल्याने सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. परंतु सोनं आपल्याकडे तारण ठेवून ग्राहकांना गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्या, बँका, एनबीएफसींची मात्र डोकेदुखी वाढली आहे. बाजारात सोन्याचा भाव कमी झाला तरी दिलेले कर्ज मात्र तेवढेच असते. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्था आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन आता आरबीआयने अशा कंपन्यांची चौकशी करण्याची गती वाढवली आहे.
रिपोर्टनुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून गोल्ड लोन पोर्टफोलिओ, कर्जाची परतफेड करताना येत असलेल्या अडचणी, गहाण ठेवलेल्या सोन्याच्या तुलनेत दिलेले कर्ज याची चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये गोल्ड लोन देणाऱ्या संस्थांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळलेले नाही.
सोन्याचा भाव पडल्यावर टेन्शन का वाढतं?
ग्राहक आपल्याकडे असलेलं सोन गहाण ठेवून त्या बदल्यात कर्जाच्या रुपात पैसे घेतात. परंतु सोन्याचा भाव घसरल्यावर गहाण ठेवलेल्या सोन्याचे मूल्य कमी होते. दुसरीकडे कर्ज म्हणून दिलेली रक्कम मात्र कमी होत नाही. या स्थितीमुळे कर्ज आणि सोन्याचे मूल्य यांतील गुणोत्तर म्हणजेच लोन टू व्हॅल्यू (LTV) वाढते. म्हणूनच गोल्ड लोन देणाऱ्या संस्था आर्थिक संकटात सापडू शकतात.
उदाहरण पाहायचं झालं तर एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपये किमतीचे सोने गहाण ठेवून 75 हजार रुपये कर्ज घेतले असेल तर या कर्जाचे सुरुवातीची लोन टू व्हॅल्यू ही 75 टक्के असते. परंतु भविष्यात सोन्याच भाव 25 हजार रुपयांनी घसरल्यास त्याच एक लाख रुपयांच्या सोन्याचे मूल्य 75 हजार होते. अशा स्थितीत सोन्याचे मूल्य आणि घेतलेले कर्ज हे बरोबर होते. परिणामी ग्राहकाने कर्जाची परतफेड न केल्यास कर्ज देणाऱ्या संस्थेला आर्थिक फटका बसतो.
दरम्यान, कर्ज देणाऱ्या कंपन्यांची अशी स्थिती होऊ नये यासाटी आरबीआयने काही नियम लागू केलेले आहेत. सोन्यावर किती LTV असायला हवी याचे काही नियम आहेत. 2.5 लाख रुपयांच्या कर्जावर 85 टक्के LTV असायला हवी. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या कर्जावर 80 टक्के LTV हवी. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असेल तर 75 टक्के LTV असावे.
