पतीसोबतच्या वादादरम्यान सपना चौधरीची नवीन Video समोर, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून सपना चौधरीच्या पतीसोबतच्या वादाच्या अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच आता अभिनेत्रीने तिचा नवीन लुक शेअर केला असून तो सध्या चर्चेत आला आहे.

प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधण्यासाठी ती विविध फोटो, व्हिडिओ आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, तिच्या साध्या आणि आकर्षक लूकचेदेखील कौतुक होत आहे.
सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावर आनंदाने आणि बेफिकीरपणे फिरताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने एक प्रेरणादायी संदेश लिहिला आहे. ‘सौंदर्य हे फक्त लोकांचे लक्ष वेधून घेते, पण माणसाचे चांगले चारित्र्य कायमचे मन जिंकून घेते.’ या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले असून, सौंदर्यापेक्षा स्वभाव आणि चारित्र्य अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद
सपना चौधरीच्या या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या विचारांचे समर्थन केले असून, काहींनी तिच्या साध्या आणि पारंपरिक हरियाणवी लूकचे विशेष कौतुक केले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मात्र ती हरियाणवी पारंपरिक वेशभूषेत अधिक सुंदर दिसते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सपना चौधरी ही हरियाणवी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानली जाते. हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये तिच्या स्टेज शोला प्रचंड गर्दी होते. तिच्या कार्यक्रमांना हजारो-लाखो प्रेक्षक उपस्थित राहत असल्याने तिची लोकप्रियता आजही कायम असल्याचे दिसून येते.
वैवाहिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत
व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतानाच सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादामुळेही चर्चेत आहे. जानेवारी 2020 मध्ये तिने हरियाणवी गायक आणि संगीतकार वीर साहू यांच्यासोबत गुप्तपणे कोर्ट मॅरेज केले होते. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या वैवाहिक नात्यात मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.