Savita Malpekar : …नाहीतर आज मी जिवंतच राहिले नसते, सविता मालपेकर यांनी सांगितला कठीण काळ, 3 महिने केलेला डिप्रेशनचा सामना
Savita Malpekar : सविता मालपेकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. मात्र, व्यावसायिक आयुष्यात यश मिळत असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक कठीण प्रसंग आले. एका मुलाखतीत त्यांनी आयुष्यातील अत्यंत वाईट काळाबद्दल सांगितलं. आईच्या निधनानंतर त्या तब्बल तीन महिने नैराश्यात होत्या. या कठीण काळात अभिनेते आणि निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना मोठा आधार दिला होता. याबद्दल बोलताना सविता यांनी भावुक होत कृतज्ञता व्यक्त केली.
सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग
सविता मालपेकर म्हणाल्या की, ‘माझी आई गेली तेव्हा मी अचानक डिप्रेशन मध्ये गेले. हे सगळं इतकं अचानक झालं की, ती रात्री माझ्याशी बोललेली आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी नाही हे मला सहन करणं थोडं कठीण गेलं. या सगळ्या गोष्टीमुळे मला सारखं रडायला यायचं. माझी चिडचिड व्हायची. पण, बाकीच्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि मला ते सांगायला आवडत नसल्यामुळे मी कोणाला सांगायचे नाही. पण त्या काळात माझी प्रचंड चिडचिड होत होती, मला रडू येत होतं. साधं कोणी बोललं तरी मला रडायला यायचं, माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायचं. मग काहीतरी चिडचिड होऊन मी बोलायचे.’
‘त्यावेळी तिथे मी जे उलट सुलट बोलले असेल तर ते सर्व डिप्रेशन मध्ये बोललेले. पण, अमोल कोल्हे आणि त्या प्रोडक्शनने मला जे सांभाळून घेतलंय आणि झी चे इपी सुद्धा त्यांना खरं तर माझ्याबद्दल माहित नव्हतं. पण, तरीही ते मला खूप सांभाळून घेत होते. त्यावेळी अमोल कोल्हेनं मला प्रचंड सांभाळलं आहे. त्या काळात मी उशिरा सेटवर जायचे. त्यामुळे, माझ्याबद्दल अनेकांचे गैरसमज झाले असतील किंवा बोंबाबोंब ही झाली असेल. पण, तेव्हा माझी अशी परिस्थिती होती की, मी आई गेल्यानंतर तीन महिने डिप्रेशन मध्ये गेले होते. त्या डिप्रेशन मधून मला माझ्या भावंडांनी बाहेर काढलं. माझी मुलगी, माझे भावंड, माझी नात या सगळ्यांनी मिळून मला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढलं नसतं तर आज सविता मालपेकर जिवंतच राहिली नसती.’
‘अशी अनेक प्रोडक्शन्स आहेत जी सांभाळून घेतात. कुठल्या सेटवर वाला त्रास दिला नाही. एक ‘लक्ष्मी वर्सेस सरस्वती’ या मालिकेच्या सेटवरचा सोडलं तर मला कुठेच त्रास दिला गेला नाही. शिवाय इंडस्ट्रीतली ग्रुपिझम करणारी माणसं मला माहित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा का करायचा.’ राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सविता मालपेकर बोलत होत्या.