Shabana Azmi: बुरखा घालू नको असं सांगितलं तर..; शबाना आझमी स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं?
Shabana Azmi: ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आल्या आहेत. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी परखड मत मांडलं आहे.

Shabana Azmi: बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या अभिनयासोबतच सामाजिक आणि वैचारिक भूमिकांसाठीही ओळखल्या जातात. कोणत्याही विषयावर आपलं मत स्पष्टपणे मांडायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. आता पुन्हा एकदा त्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मला बुरखा घालू नको असं सांगितलं, तर मी तीन बुरखे घालेन’, असं त्या म्हणाल्या आहेत. नुकत्याच उषा काकडे यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी या विषयावर भाष्य केलं.
‘कुराणमध्ये बुरखा घालण्याचा उल्लेख नाही’
या पॉडकास्टमध्ये शबाना आझमी यांनी कुराण आणि महिलांच्या पोशाखासंदर्भातील आपल्या समजुतींबद्दल सांगितलं. त्यांच्या मते, महिलांनी विशिष्ट प्रकारचा बुरखा परिधान करावा, असं कुराणमध्ये कुठेही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. तर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही नजरेत नम्रता आणि सभ्यता असावी, असा संदेश देण्यात आला आहे. धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांमुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात, असंही त्यांनी म्हटलं.
बुरखा घालण्याची किंवा न घालण्याची सक्ती नको
शबाना आझमी यांनी स्पष्ट केलं की, त्या स्वतः बुरखा परिधान करत नाहीत. मात्र, एखाद्याने त्यांना बुरखा घालू नका असं सांगितलं, तर त्या मुद्दाम तीन बुरखे घालतील. एखाद्या व्यक्तीने काय परिधान करावं किंवा करू नये, हे दुसऱ्याने ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मूलतत्त्ववादाला प्रोत्साहन दिलं जाऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी 2022 मध्ये कर्नाटकातील हिजाब वादाच्या वेळीही शबाना यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी अभिनेत्री कंगना राणौतने त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शबाना यांनी भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असल्याचं सांगितलं होतं.
याच पॉडकास्टमध्ये शबाना यांनी कलाकारांच्या राजकारणातील प्रवेशावरही भाष्य केलं. कलाकारांनी राजकारणात जाणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं त्या म्हणाल्या. मात्र, केवळ सन्मानाचं पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश करू नये, असं त्यांचं मत आहे. कलाकारांना समाजाकडून भरपूर प्रेम आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.