पुरुषांची पार्टी आहे, एकटीच ये..; ‘शक्तीमान’ फेम अभिनेत्रीकडे हिरोची नको ती डिमांड, नकार देताच..

'शक्तीमान' या लोकप्रिय मालिकेत गीता विश्वासची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्डने कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला. हिरोची डिमांड नकारल्याने तिला एका बिग बजेट चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं.

पुरुषांची पार्टी आहे, एकटीच ये..; शक्तीमान फेम अभिनेत्रीकडे हिरोची नको ती डिमांड, नकार देताच..
वैष्णवी मॅकडॉनल्ड
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2026 | 10:34 AM

फिल्म इंडस्ट्रीत अनेकांना कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव आले. काहींनी त्याविषयी मौन बाळगणं पसंत केलं तर काहींनी आपले अनुभव मोकळेपणे सांगितले. आता ‘शक्तीमान’ फेम अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्डने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. ‘शक्तीमान’ या गाजलेल्या मालिकेत तिने गीता विश्वासची भूमिका साकारली होती. वैष्णवीने मालिकांसोबत चित्रपटांमध्येही काम केलंय, परंतु मोठ्या पडद्यावर काम करण्याचा तिचा अनुभव खूप वाईट राहिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने सांगितलं की, तिने हिरोसोबत तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे तिला एका चित्रपटातून काढून टाकलं होतं.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवीने सांगितलं की अशा अनुभवांमुळे ती चित्रपटांपासून दूर गेली. त्याचदरम्यान तिला मुकेश खन्नाच्या ‘शक्तीमान’ या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने लगेच होकार दिला. ज्या चित्रपटातून वैष्णवीला काढून टाकलं होतं, त्यात तिची मुख्य भूमिका होती आणि त्या चित्रपटाचे पोस्टर्स आणि बॅनर्ससुद्धा छापले गेले होते.

वैष्णवी म्हणाली, “मला आणि माझ्या आईला ऑफिसमध्ये बसवण्यात आलं आणि सांगण्यात आलं होतं की, ऐका.. पोस्टर्स आणि बॅनर्स बनवले गेले आहेत, त्यात वैष्णवी आहे. मी त्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते. पण मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. दिग्दर्शक आणि हिरो एकत्र बसले आणि त्यांनी निर्णय घेतला की मी त्या चित्रपटाचा भाग होऊ शकत नाही, कारण मी तडजोड करण्यास तयार नव्हती. तो हिरो त्यावेळी खूप मोठा होता.”

तडजोडीसाठी तुला कशाप्रकारे विचारण्यात आलं होतं, असा सवाल केला असता वैष्णवीने सांगितलं, “संध्याकाळच्या वेळी ये जरा, फक्त पुरुष बसले आहेत, ड्रिंक्स करत आहेत, प्लीज ये, असं तो म्हणाला. माझी आई माझ्यासोबत नेहमी राहायची. ती गोष्ट त्याला खूप खटकायची. माझी आई मला कधीच एकटं सोडत नव्हती. मी तिच्यासोबतच राहायचे. मला सेटवर सोडायला आणि न्यायलासुद्धा तीच यायची. त्या प्रॉडक्शन हाऊसने स्वित्झर्लंडमधील शूटिंगसाठी माझा पासपोर्ट बनवला होता, परंतु आईचं बनत नसल्याचं कारण दिलं होतं. मी त्या हिरोला जेव्हा कॉम्प्रमाइज करण्यास नकार दिला, तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याने थेट दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेशी बोलून मला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.”

Follow Us