
‘काटा लगा’ या रिमिक्स अल्बममधील गाण्याने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ती 42 वर्षांची होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असलं तरी मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. शेफालीच्या निधनावर आता तिचा पूर्व पती हरमीत सिंहची प्रतिक्रिया समोर आली आहे. हरमीत सध्या युरोपमध्ये असून पूर्व पत्नीच्या अंत्यविधीला तो उपस्थित राहू शकला नाही.
हरमीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून त्यात म्हटलंय, ‘मी सध्या युरोपमध्ये असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नाही. याचं मला फार दु:ख आहे. शेफालीने खूपच लवकर या जगाचा निरोप घेतला. तिच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’ शेफालीचं पहिलं लग्न प्रसिद्ध संगीतकार जोडी मीत ब्रदर्समधील हरमीत सिंहशी झालं होतं. हरमीतला ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’, ‘बेबी डॉल’, ‘पिंक लिप्स’, ‘राधे राधे’ यांसारख्या गाण्यांसाठी ओळखलं जातं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शेफाली आणि हरमीतने 2004 मध्ये लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. हरमीतला घटस्फोट दिल्यानंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी 2014 मध्ये दुसरं लग्न केलं.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.