शेफालीच्या अखेरच्या क्षणांत नेमकं काय घडलं? पतीला लगेच बोलावून घेतलं अन्..; जवळच्या मैत्रिणीचा खुलासा

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनापूर्वी अखेरच्या क्षणांत नेमकं काय घडलं होतं, याविषयी तिची जवळची मैत्रीण पूजा घईने खुलासा केला. शेफालीच्या घरी सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी संपूर्ण घर सजवण्यात आलं होतं.

शेफालीच्या अखेरच्या क्षणांत नेमकं काय घडलं? पतीला लगेच बोलावून घेतलं अन्..; जवळच्या मैत्रिणीचा खुलासा
Shefali Jariwala and Pooja Ghai
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2025 | 9:54 AM

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 वर्षी तिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 27 जून रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं होतं, याविषयी आता तिची जवळची मैत्रीण पूजा घई एका मुलाखतीत व्यक्त झाली. शेफालीचा पती पराग त्यागीने पूजाला त्याविषयीची माहिती दिली होती. अखेरच्या काही क्षणांत काय घडलं होतं, शेफालीची अवस्था कशी होती, याविषयी त्याने पूजाला सांगितलं होतं.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “त्यादिवशी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी संपूर्ण घर सजवण्यात आलं होतं. शेफालीच्या निधनानंतर जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो, तेव्हा ती सजावट तशीच होती. शुक्रवारी रात्री पूजेनंतर शेफाली जेवली आणि तिने पतीला त्यांच्या पाळीव श्वानाला खाली फिरवण्यासाठी घेऊन जायला सांगितलं होतं. त्यांच्या पाळीव श्वानाचंही वय खूप जास्त आहे. पराग त्याला घेऊन जसा इमारतीच्या खाली गेला, तसं त्याला घरातील एका कर्मचाऱ्याने फोन केला. दीदीला बरं वाटत नाहीये, असं त्याने परागला सांगितलं. तू जरा वर येशील का, मला बरं वाटत नाहीये, असं शेफाली परागला म्हणाली होती.”

परागने कर्मचाऱ्याला इमारतीखाली येऊन श्वानाला फिरवण्यास घेऊन जायला सांगितलं. तोपर्यंत तो लिफ्टजवळच त्याची प्रतीक्षा करत उभा होता. कर्मचाऱ्याकडे श्वानाला सोपवल्यानंतर पराग वर गेला. तेव्हासुद्धा शेफालीची नाडी चालू होती. पण तिचे डोळे बंदच होते. परागने तिला जवळ घेतलं तेव्हा तिचं शरीर अधिक वजनदार जाणवू लागलं होतं. काहीतरी गडबड जाणवताच त्याने लगेचच तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. परंतु बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिने प्राण गमावले होते”, असं पूजाने सांगितलं.

यावेळी पूजाने परागविषयी काळजी व्यक्त केली. “अशा दु:खद परिस्थितीतही त्याला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागेल. पत्नीच्या निधनानंतर तो पूर्णपणे खचला आहे. त्याला काही काळ एकटं राहायचं आहे. परंतु त्याला सतत पोलिसांना सामोरं जावं लागणार आहे”, असं ती म्हणाली. शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 14 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असलं तरी मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.