शेफालीचे अस्थी हातात घेऊन ढसाढसा रडला पती; Video पाहून नेटकऱ्यांनाही अश्रू अनावर
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर आज रविवारी तिचा पती पराग त्यागी आणि इतर कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी गेले. यावेळी स्मशानभूमीतून बाहेर पडताना परागला अश्रू अनावर झाले.

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. शेफालीच्या निधनाचं प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका मानलं जात आहे. तरी तिच्या शवविच्छेदन अहवालातून नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे. शेफालीचं शुक्रवारी रात्री निधन झालं. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले असून स्मशानभूमीतून पत्नीचे अस्थी विसर्जनासाठी नेताना पती पराग त्यागीला अश्रू अनावर झाले. अस्थी आपल्या छातीशी घट्ट पकडून पराग हमसून हमसून रडताना दिसला. यावेळी नातेवाईकांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.
View this post on Instagram
शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असलं तरी मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीचा ज्या रात्री मृत्यू झाला त्याच रात्री तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेफालीच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर अनेक लोक उपस्थित होते. सध्या शेफालीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. तरीही मुंबई पोलिसांचं पथक तिच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची आणि फॉरेन्सिक रिपोर्टचीही वाट पाहत आहेत.
कलाविश्वात काम करणारे अनेक कलाकार त्यांच्या लूक आणि फिटनेसविषयी खूप सजग असतात. शेफाली स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. ती ठराविक कॅप्सूल घ्यायची, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. फॉरेन्सिक टीम त्याचीही चौकशी करत आहे.
