गोरं होण्यासाठीच्या इंजेक्शनमुळे शेफाली जरीवालाचा मृत्यू? चर्चांवर अखेर परागने सोडलं मौन
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर कलाकारांच्या ब्युटी ट्रिटमेंट्सबद्दल बरीच चर्चा झाली होती. शेफालीसुद्धा सुंदर दिसण्यासाठी आणि गोरं होण्यासाठी काही इंजेक्शन्स घ्यायची, असं म्हटलं गेलं होतं. त्यावर आता परागने प्रतिक्रिया दिली आहे.

‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 2025 मध्ये निधन झालं. शेफालीच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. शेफालीच्या निधनानंतर तिच्या ब्युटी ट्रीटमेंट्सवरून वेगवेगळे दावे केले जाऊ लागले. ब्युटी ट्रीटमेंट्सच्या इंजेक्शन्समुळेच शेफालीचा मृत्यू झाल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता. या सर्व चर्चांवर आता तिचा पती पराग त्यागीने प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व चर्चा धादांत खोट्या असल्याचं परागने म्हटलं आहे. शेफालीला इंजेक्शन घेऊन गोरं होण्याची काहीच गरज नव्हती, असं पराग म्हणाला.
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत परागने सांगितलं, “आम्ही सर्व काही खातो. शेफालीने निधनाच्या एक दिवस आधी प्रत्येक प्रकारचं जेवण केलं होतं. तिने चायनीजसुद्धा खाल्लं होतं. आम्हाला उपाशी राहण्याची काहीच गरज नव्हती. ती त्यावेळी सर्वांत जास्त फिट होती. उपाशी राहिल्याने तुमच्या चेहऱ्याचा तेज हरपतो. पण शेफालीच्या बाबतीत असं काहीच झालं नव्हतं. काहींनी असाही दावा केला होता की तिने ब्युटी ट्रिटमेंटसाठी इंजेक्शन्स घेतले होते. तिला आणखी गोरं होण्याची गरज होती का? कृपया मलासुद्धा सांगा की, असे कोणते इंजेक्शन्स असतात, जे तुम्हाला जिवंत ठेवतात. असं असतं तर रतन टाटासुद्धा आज जिवंत असते.”
“शेफालीचं निधन त्यादिवशी व्हायचं होतं आणि या गोष्टीचा मी स्वीकार केला आहे. जरी आम्हाला एकमेकांसोबत फार कमी वेळ मिळाला असला तरी आमच्या आत्मा कायम एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कृपया शेफालीबद्दल अफवा पसरवणं थांबवा,” अशी विनंती परागने केली. शेफालीचं निधन 27 जून 2025 रोजी मुंबईत राहत्या निवासस्थानी झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं. शेफालीला किशोरवयात अपस्मारचा त्रास होता, परंतु त्यानंतर तिला कधीच कोणता मोठा आजार झाला नाही, असंही परागने स्पष्ट केलं.
शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. कलाविश्वात काम करणारे अनेक कलाकार त्यांच्या लूक आणि फिटनेसविषयी खूप सजग असतात. शेफाली स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत असल्याचीही माहिती समोर आली होती. ती ठराविक कॅप्सूल घ्यायची, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती.