शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची प्रेमानंद महाराजांना मोठी ऑफर; उत्तर वाचून तुम्हीही म्हणाला वाह!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा नुकतेच प्रेमानंद महाराज यांच्या दरबारी पोहोचले होते. यावेळी राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना मोठी ऑफर दिली. त्यावर महाराजांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची प्रेमानंद महाराजांना मोठी ऑफर; उत्तर वाचून तुम्हीही म्हणाला वाह!
Shilpa Shetty, Raj Kundra and Premanand Maharaj
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 14, 2025 | 4:49 PM

अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी फॉलो करतात. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना अनेकदा त्यांच्या दरबारी पाहिलं गेलंय. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हेसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला पोहोचले होते. शिल्पा आणि राज यांना प्रेमानंद महाराज यांनी मार्गदर्शन केलं. त्याचसोबत त्यांना कुठलंही व्यसन न करण्याचा सल्लासुद्धा दिला. यावेळी शिल्पा शेट्टीने हात जोडून त्यांच्यासमोर नमस्कार केला आणि राधा नावाचा जप कसा करायचा किंवा त्याची योग्य पद्धत कोणती, याविषयी प्रश्न विचारला. तर राज कुंद्राने त्याची एक इच्छा जाहीर केली.

प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे मला देवाघरी कधीही बोलावलं जाऊ शकतं, असं त्यांनी शिल्पा आणि राज यांना सांगितलं. गेल्या दहा वर्षांपासून ते डायलिसिसवर आहेत. आता मला मृत्यूचंही भय नाही, असं ते म्हणाले. हे ऐकून राजने हात जोडून त्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “तुम्ही इतके लोकप्रिय आहात. माझ्या मनात जेव्हा कधी एखादा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा दुसऱ्याच दिवशी व्हिडीओच्या माध्यमातून मला त्याचं उत्तर मिळून जातं. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहात. इतक्या लोकांची तुम्ही मदत करता. मी तुमच्या समस्येला ओळखतो आणि जर कधी मी तुमच्या कामी आलो तर माझी एक किडणी तुमच्या नावे करेन.”

राजचं हे बोलणं ऐकून शिल्पासुद्धा चकीत होते. परंतु प्रेमानंद महाराज त्याची ही विनंती नाकारत म्हणतात की, “फक्त तुम्ही निरोगी राहा, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. जोपर्यंत देवाचं बोलावणं येत नाही, तोपर्यंत ही किडणी माझं काहीच बिघडवू शकत नाही. जेव्हा देवाकडून बोलावलं जातं, तेव्हा सर्वांनाच जावं लागतं. परंतु तुमची ही सद्भावना मी मनापासून स्वीकारतो.” प्रेमानंद महाराज यांच्या अनुयायांमध्ये बी प्राक, जास्मिन सँडलस यांसारख्या अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी आवर्जून वृंदावनला जातात.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा मोठा बिझनेसमन असून त्याची कोट्यवधींची संपत्ती आहे. परंतु पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात त्याला बरेच दिवस तुरुंगातही राहावं लागलं होतं. सध्या शिल्पा आणि राज यांच्यावर एका व्यावसायिकाने 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचाही आरोप केला आहे.