
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील एका व्यावसायिकाने 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता शिल्पा आणि राजचे वकील प्रशांत पाटील यांनी अधिकृत निवेदन जारी केलं आहे. हे आरोप त्यांची बदनामी करण्यासाठी आहेत, असं म्हणत प्रशांत यांनी शिल्पा आणि राज यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत. या दोघांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत कथित गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांना इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या एका विशिष्ट वर्गाकडून कळल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे 4 ऑक्टोबर 2024 रोजी एनसीएलटी मुंबईने त्यांचा निर्णय दिला आहे, असंही शिल्पाच्या वकिलांनी सांगितलं आहे.
’60 कोटी रुपयांच्या फसवणुकीबद्दल जो आरोप करण्यात आला आहे, जो फार जुना व्यवहार आहे. ज्यामध्ये कंपनी आर्थिक अडचणीत आली होती आणि त्यानंतर एनसीएलटीमध्ये त्याप्रकरणी दीर्घकाळ कायदेशीर खटला सुरू होता. यामध्ये कोणताही गुन्हेगारी संबंध नाही आणि आमच्या लेखापरीक्षकांनी वेळोवेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मागितलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांमध्ये सर्व तपशील आहेत’, असं वकील प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
शिल्पाच्या वकिलांनी असंही सांगितलं आहे की हा गुंतवणूक करार पूर्णपणे इक्विटी गुंतवणुकीच्या स्वरुपाचा आहे. ‘कंपनीला आधीच एक लिक्विडेशन ऑर्डर मिळाला आहे, जो पोलीस विभागासमोरही ठेवण्यात आला आहे. संबंधित चार्टर अकाऊंट्सनी गेल्या वर्षभरात 15 पेक्षा जास्त वेळा पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. माझ्या क्लायंटच्या दाव्यांना समर्थन देणारे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत’, असं ते पुढे म्हणाले. व्यावसायिकाने केलेल्या आरोपांविरोधात शिल्पा आणि राज कुंद्रा कायदेशीर कारवाई करणार असल्याचीही माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. ‘हे आमच्या क्लायंटना बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले निराधार आणि द्वेषपूर्ण आरोप आहेत. आमच्याकडून याविरोधात योग्य ती कारवाई सुरू केली जात आहे’, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
व्यावसायिक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या खटल्यानुसार, राजेश आर्य यांनी त्यांची शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख करून दिली होती. राज आणि शिल्पा हे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. ते एक होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होतं. दाखल केलेल्या अहवालानुसार, शिल्पा आणि राज यांनी 75 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ज्यावर त्यांना 12 टक्के व्याज द्यावं लागलं. हे व्याज टाळण्यासाठी राज आणि शिल्पाने त्यात फेरफार केला आणि कर्जाऐवजी कंपनीत गुंतवणूक म्हणून दाखवलं. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दोघांनी दरमहा ही रक्कम परत करण्याचा आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी ते पूर्ण केलं नाही. एफआयआरनुसार, शिल्पा शेट्टी या व्यवहाराची साक्षीदार होती.