सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी शोएबने केला होता निकाह? काय आहे पहिल्या लग्नाचा वाद?

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दुसऱ्यांदा निकाह केला आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशी शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. या चर्चांदरम्यान शनिवारी त्याने थेट दुसऱ्या निकाहचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनंतर शोएबच्या पहिल्या निकाहविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी शोएबने केला होता निकाह? काय आहे पहिल्या लग्नाचा वाद?
Shoaib Malik's marriages
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2024 | 1:43 PM

लाहोर : 20 जानेवारी 2024 | भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दुसऱ्या निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र त्यावर दोघांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. ऑन रेकॉर्ड शोएब मलिकचा हा दुसरा निकाह असला तरी सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी आयेशा सिद्दिकी नावाच्या महिलेनं त्याच्याशी निकाह केल्याचा दावा केला होता. मात्र शोएबने हा दावा फेटाळला होता. त्यामुळे त्याचं हे तिसरं लग्न आहे की दुसरं याविषयी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

सानिया मिर्झाशी निकाह करण्यापूर्वी शोएबने आयेशा सिद्दिकीशी निकाह केल्याचा आरोप होता. आयेशा, तिची बहीण माहा आणि तिच्या कुटुंबीयांनी नॅशनल टेलिव्हिजनवर येत शोएबवर आरोप केले होते. आयेशाच्या या संपूर्ण प्रकरणाला शोएबने केवळ एक फसवणूक असल्याचं म्हटलं होतं. ज्या मुलीचे मी फोटो पाहिले आणि जी मुलगी माझ्यावर आरोप करतेय, त्या दोघी वेगळ्या आहेत, असं त्याने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर शोएबने आयेशाचे वडील एम. ए. सिद्दिकीन यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. त्यावेळी आयेशानेही शोएबविरोधात फसवणुकीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

2002 मध्ये शोएब आणि माझा निकाह झाला होता असं म्हणत आयेशाने पुरावे म्हणून लग्नाचे व्हिडीओसुद्धा शेअर केले होते. इतकंच नव्हे तर “मलाच शोएबला घटस्फोट द्यायचा होता. त्याच्याकडून मला घटस्फोटानंतर 15 कोटी रुपयांची पोटगीसुद्धा मिळाली”, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. सानियाशी निकाह करण्यापूर्वी शोएबने आयेशाचे सर्व आरोप फेटाळले होते. सानियाची माझी पहिली पत्नी, असं त्याने स्पष्ट केलं होतं.

कोण आहे शोएब मलिकची दुसरी पत्नी?

सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी सौदी अरबमधील जेदाह याठिकाणी झाला. उर्दू टेलिव्हिजनवरील भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. कराचीतील विद्यापिठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 मध्ये तिने अभिनयात पदार्पण केलं. ‘खानी’, ‘रुसवाई’ आणि ‘डंक’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या आहेत. सनाचंही हे दुसरं लग्न आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने गायक उमेर जस्वालशी निकाह केला होता. कराचीमधल्या घरीच दोघांनी गुपचूप निकाह केला होता.