
बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट ‘शोले’ला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. चित्रपटातील अनेक कलाकार मुलाखतींमध्ये चित्रपटांचे किस्से सांगताना दिसतात. असाच एक किस्सा अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही सांगितला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांचा शोलेमधला एक सीन काढून टाकण्यात आला होता त्यामुळे त्यांना फार वाईट वाटलं होतं.
त्या सीनमध्ये सचिनला मारण्यात आलं होतं
चित्रपटात अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी रहीम चाचा यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. ज्याबद्दल त्यांनी एक खास गोष्ट सांगितली आहे. सचिनने सांगितले की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातून त्यांचा खास सीन काढून टाकला होता आणि त्यामागे अनेक कारणे होती. सचिन म्हणाले की, “ज्या सीनमध्ये मला मारण्यात आलं ते गब्बरचा जो अड्डा होता त्या ठिकाणी हा सीन चित्रित करण्यात आला होता, परंतु रमेश यांनी काही कारणांमुळे एडिटिंग दरम्यान हे सीन काढून टाकला”
माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो…
पुढे ते म्हणाले की, “पहिलं कारण म्हणजे चित्रपट खूप लांबत होता, ज्यामुळे तो काढून टाकावा लागला आणि दुसरे म्हणजे, दिग्दर्शक रमेशला वाटले की 16-17 वर्षांच्या मुलाची हत्या दाखवणे खूप विचित्र वाटेल. त्यानंतर शेवटच्या सीनमध्ये गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालताना दिसते, जी पाहून गब्बर म्हणतो, “रामगढ का बेटा आया है,” आणि नंतर तो त्या मुंगीला मारतो. यानंतर, माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो, ज्यावरून माझ्या पात्राची हत्या झाल्याचे दिसून येते.”
सीन कापल्यामुळे सचिन पिळगांवकर दुःखी झाले
सचिन पिळगांवकर म्हणाले की, त्यावेळी त्यांना असे वाटायचे की ते एक अभिनेता आहेत. ‘शोले’ मधील तो सीन कट झालेला पाहून ते फार दु:खी झाले होते. ते म्हणाले, “त्यावेळी मला खूप वाईट वाटले कारण गब्बरसोबत माझा एक खास सीन होता आणि तो काढून टाकण्यात आला होता. कोणत्याही कलाकाराला असेच वाटेल.’
सचिन पिळगावकर यांनी रमेश सिप्पी यांचे कौतुकही केले
सचिन यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या दृष्टिकोनातून रमेश सिप्पी यांच्या निर्णयाचे कौतुकही केले, ते म्हणाले “पण आज जेव्हा मी स्वतः एक दिग्दर्शक आहे, तेव्हा मला समजतं की रमेशजींनी जे केलं ते बरोबर केलं होतं”