2026 मध्ये बसून आपण 500 वर्षांपूर्वीच्या लोकांचा विचार..; स्वरा भास्करच्या ‘पद्मावत’ वक्तव्यावर श्रिया पिळगांवकर स्पष्टच बोलली
अभिनेत्री स्वरा भास्करने 'पद्मावत'मधील जौहरबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने प्रतिक्रिया दिली आहे. श्रिया नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’च्या दृश्यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. स्वरा भास्करने या दृश्याच्या चित्रणावर प्रश्न उपस्थित करताना, अशा प्रसंगातून महिलांच्या सन्मानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं मत व्यक्त केलं होतं. तिच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. या वादात आता अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनेही तिचं मत मांडलं आहे. तिच्या मते, इतिहासातील घटना आणि त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना आजच्या काळातील मानसिकता थेट लागू करणं योग्य नाही. प्रत्येक काळाची संस्कृती, सामाजिक मूल्यं आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांकडे आजच्या दृष्टिकोनातून पाहताना त्यामागचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेणं गरजेचं असल्याचं श्रियाने सांगितलं.
काय म्हणाली श्रिया?
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, “शंभर, दोनशे किंवा पाचशे वर्षे जुन्या सांस्कृतिक संदर्भात राहणारे लोक काय विचार करत होते, त्यांची मूल्ये काय होती, त्यांना काय करायचं होतं किंवा त्यांना कोणत्या दबावांचा सामना करावा लागला, याचा आपण 2026 मध्ये अंदाज लावू शकत नाही. प्रत्येक संस्कृती काळ, परिस्थिती आणि मानवी स्थितीनुसार विकसित होत असते. एखादी मानसिकता गृहीत धरणं मला योग्य वाटत नाही. एका वेगळ्या काळाबद्दल सर्वसाधारण चर्चा किंवा सर्वसाधारण निष्कर्ष काढण्यावर माझा विश्वास नाही.”
संस्कृती ही काळानुसार बदलत असते. आज समाजात महिलांच्या हक्कांविषयी आणि त्यांच्या स्वातंत्र्याविषयी असलेली समज पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे जुन्या काळातील एखाद्या प्रथेचा किंवा निर्णयाचा आजच्या मूल्यांच्या आधारे थेट योग्य-अयोग्य असा निकाल लावणं योग्य ठरणार नाही, असं मत श्रियाने मांडलं आहे.
स्वरा भास्करने तिच्या वक्तव्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना आपण राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या महिलांना ‘भ्याड’ म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तिचा आक्षेप पद्मावतमधील जौहरच्या चित्रणावर आणि त्यातून जाणाऱ्या संदेशावर असल्याचं तिने सांगितलं. बलात्कारातून वाचलेल्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हा मुद्दा मांडण्याचा आपला उद्देश असल्याचं स्वरा म्हणाली.