Neha Kakkar : ‘ कोल्ह्याला द्राक्षं आंबट…’ सुनिधीच्या ‘स्क्रिप्टेड शो’च्या वक्तव्यावर नेहा कक्करचा पलटवार

'आय-पॉपस्टार व्हॉल्यूम 2' च्या प्रमोशनदरम्यान नेहा कक्करने रिॲलिटी शो स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. नेहाने शो स्क्रिप्टेड नसल्याचे स्पष्ट करत स्पर्धकांच्या भावना स्वाभाविक असल्याचे सांगितले.

Neha Kakkar : ‘ कोल्ह्याला द्राक्षं आंबट...’  सुनिधीच्या ‘स्क्रिप्टेड शो’च्या वक्तव्यावर नेहा कक्करचा पलटवार
Neha Kakkar Taunt
| Updated on: Sep 09, 2026 | 4:12 PM

गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही अनेक रिॲलिटी शोजमध्ये जज म्हणून झळकली आहे. आता नेहा ही आय-पॉपस्टार व्हॉल्यूम 2 हा शो घेऊन येत आहे. या शोमध्ये देखील नेहा जज म्हणून दिसणार आहे. मात्र या शोच्या प्रमोशन दरम्यान विचारलेल्या प्रश्नावर नेहाने जे उत्तर दिलं, त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. हे रिॲलिटी शोज स्क्रिप्टेड असं म्हटलं जातं, त्यावरून सोशल मीडियावरही बराच वाद होत असतो. याच मुद्यावरून नेहाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना नेहाने सुनिधी चौहान हिच्या जुन्या वक्तव्यावर रिॲक्शन देत तिला टोमणा मारला. सुनिधी चौहान हिने यापूर्वी रिॲलिटी शोपासून दूर राहण्याचं कारण सांगताना त्यामध्ये स्क्रिप्टेड सीन आणि ऑटो-ट्यूनच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केलं होतं. आता नेहा कक्कडने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘आय-पॉपस्टार व्हॉल्यूम 2’च्या लॉन्चदरम्यान नेहा कक्कडने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिला विचारण्यात आले की, सुनिधी चौहानसारख्या गायकांनी सिंगिंग रिअॅलिटी शोजना बनावट आणि स्क्रिप्टेड म्हटलं आहे, त्यामुळे या शोची लोकप्रियता कमी झाली का?. “ लोकप्रियता कमी झाली कारण मी ते (शो) करणं बंद केले. जोपर्यंत मी (काम) हे करत होते, तोपर्यंत टीआरपी सर्वाधिक होता.” असं उत्तर नेहाने त्यावर दिलं.

सुनिधी चौहानच्या वक्तव्यावरदिली प्रतिक्रिया

सुनिधी चौहानने सिंगिंग रिॲलिटी शोजबाबत केलेल्या वक्तव्यावर नेहा कक्कडने प्रतिक्रिया दिली. सुनिधीच्या मतावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना नेहा म्हणाली, ‘सॉरी, पण मला एवढंच म्हणायचंय की, ‘कोल्ह्याला द्राक्षं आबंट.. ‘  ज्याला एखादी गोष्ट मिळत नाही, त्याला ती नंतर चुकीची किंवा वाईट वाटू लागते’ असं म्हणत नेहाने टोला लगावला.

हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही, असं नेहाने पुढे स्पष्ट केलं. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य स्क्रिप्टेड नसतं. आपण सगळेच साध्या पार्श्वभूमीतून आलो आहोत. एखाद्याची कहाणी ऐकून मला भावूक वाटत असेल, तर त्यात काही गैर नाही. ती एक स्वाभाविक भावना आहे, असं नेहा पुढे म्हणाली.

काय म्हणाली होती सुनिधी चौहान ?

दरम्यान, शेखर सुमनसोबतच्या एका मुलाखतीत सुनिधी चौहानने सिंगिंग रिॲलिटी शोजपासून दूर जाण्यामागचं कारण सांगितलं होतं. ‘मी बराच काळ या शोजचा भाग होते. मात्र, नंतर मला जाणवलं की ही माझ्यासाठी योग्य जागा नाही आणि त्यामुळे मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला’,असं ती म्हणाली होती. एवढंच नव्हे तर ऑटो-ट्यूनच्या वाढत्या वापराबाबतही सुनिधीने चिंता व्यक्त केली होती. ती म्हणाली, ‘पूर्वी ऑटो-ट्यूनचा वापर गाण्याला विशिष्ट आवाज किंवा इफेक्ट देण्यासाठी केला जायचा. संगीताला एक वेगळा अंदाज देण्यासाठी आणि ते अधिक चांगलं करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असे. मात्र, आता त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळतं’ असंही तिने म्हटलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us