अखेरच्या क्षणी स्मिता पाटील यांची अशी होती अवस्था; जवळच्या मैत्रिणीकडून खुलासा

स्मिता पाटील या हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आता स्मिता पाटील यांची अत्यंत जवळची मैत्रीण अरुणा राजे त्यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

अखेरच्या क्षणी स्मिता पाटील यांची अशी होती अवस्था; जवळच्या मैत्रिणीकडून खुलासा
Raj Babbar and Smita Patil
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 1:11 PM

अभिनेत्री स्मिता पाटील यांचं वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी डिलिव्हरीच्या समस्यांमुळे निधन झालं होतं. मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता स्मिता पाटील यांची सर्वांत जवळची मैत्रीण आणि चित्रपट निर्मात्या अरुणा राजे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आठवणींना उजाळा दिला. स्मिता पाटील यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस हे फारच दु:खाचे होते. राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्यामुळे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय त्यांच्यापासून दुरावले होते. तर दुसरीकडे राज बब्बर हे आधीपासून नादिरा बब्बर यांच्याशी विवाहित होते आणि या दोघांना मुलंही आहेत.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्या निधनापूर्वीच्या क्षणांना आठवत अरुणा राजे म्हणाल्या, “मला तिच्या गंभीर अवस्थेबद्दलची माहिती मिळताच मी जसलोक रुग्णालयात पळाली होती. परंतु तिथे गेल्यानंतर मी जे पाहिलं, ते मी कधीच विसरू शकणार नाही. मी स्मिताला अशा अवस्थेत पाहिलं होतं, जे मी शब्दांत सांगू शकत नाही. ती आम्हाला कायमची सोडून गेली आणि ती परत कधीच येऊ शकत नाही, हे मला माहीत होतं. आई पूर्णपणे खचली होती, परंतु नवजात प्रतीकसाठी त्यांना स्वत:ला सावरलं लागलं होतं.”

स्मिता यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अरुणा यांच्याकडे काही पत्र आणि नोट्स सोपवले. ते पत्र वाचताना अरुणा यांना स्मिता यांच्या आयुष्याची अत्यंत भावूक बाजू समजली होती. “त्या पत्रांमधून मला समजलं होतं की स्मिता राज बब्बर यांच्यावर किती प्रेम करायची. सार्वजनिकरित्या जे प्रेम दिसतं, त्यापेक्षा ते अधिक खोलवरचं प्रेम होतं. ती राजच्या प्रेमात वेडी होती. तिने सात महिन्यांची गरोदर असताना राजसाठी करवा चौथचा उपवास केला होता. असं न करण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. तरीसुद्धा तिने ते केलं होतं. मीच अशी एकमेव व्यक्ती होती, जी स्मिताच्या संपर्कात शेवटपर्यंत होती. कारण इतर सर्वजण तिच्यापासून दुरावले होते. ती तिच्या आयुष्यातील कटू आणि कठीण क्षण माझ्यासोबत शेअर करायची”, असं राजे यांनी सांगितलं.

स्मिता पाटील जेव्हा राज बब्बर यांच्या प्रेमात होत्या, तेव्हा ते आधीपासूनच विवाहित होते. त्यांचं नादिराशी लग्न झालेलं होतं. तरीही स्मिता पाटील यांनी विवाहित राज बब्बर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मुलगा प्रतीकला जन्म दिला, परंतु डिलिव्हरीच्या काही दिवसांनंतर त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर राज बब्बर त्यांच्या पहिली पत्नी आणि मुलांकडे परतले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us