‘असला आमदार नको ग बाई!’ मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सापडल्या अनेक चिठ्ठ्या, एकात शिवीगाळ तर दुसरीत अजब मागणी
Chhatrapati Sambhajinagar Marathwada Graduates constituency election: पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीतही अनेक चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्यातील भन्नाट संदेश सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. पदवीधरांनी त्यांचा रोष व्यक्त केला आहे.

Marathwada Graduates constituency election result 2026: पुण्यात काल मतमोजणी वेळी चिठ्ठी सापडली होती. त्याची जोरदार चर्चा झाली. तर आता छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीतही अनेक चिठ्ठ्या सापडल्या आहेत. काही चिठ्यांमधून भडक संदेश देण्यात आला आहे. काहींना पार शिव्या घातल्या आहेत. तर काही चिठ्ठीत पदवीधरांनी त्यांची निराशा व्यक्त केली आहे. उमेदवारांविषयीच नाही तर एकूणच व्यवस्थेविषयी पदवीधरांची चिड यातून समोर आली आहे. काय आहे त्या चिठ्ठीत?
चिठ्ठीतून मतदारांचा रोष समोर
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काल पासून अनेक चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्या आहेत. या चिठ्ठी प्रकरणातून मतदारांनी त्यांची मतं मांडली आहे. त्यांच्या मनातील भावना, रोष, संताप व्यक्त केला आहे. काल पुण्यातही अशीच चिठ्ठी सापडली होती. पण मराठवाडा पदवीधऱ मतदारसंघातील चिठ्यांमधून मतदारांचा रागही व्यक्त झाला आहे.
यातील एका चिठ्ठीत एका उमेदवाराचा नाम उल्लेख करत थेट शिवीगाळ करण्यात आली आहे.
पदवी केली पश्चाताप झाला, एका चिठ्ठीत असा उल्लेख आहे.
अंशतः मान्यताप्राप्त शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे अशी मागणी एका चिठ्ठीतून करण्यात आली आहे.
एका उमेदवाराचे नाव घेऊन आता थांबा असा टोमणाही मारण्यात आला आहे.
‘असला आमदार नको ग बाई’ म्हणत एका चिठ्ठीत जोरदार टोला हाणण्यात आला आहे.
पुण्यातही मतपेटीतून चिठ्ठी बाहेर
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा, अशी धमकीही देण्यात आली. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्रावर ही चिठ्ठी टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजेवाडी बुथच्या पेटीतून ही चिठ्ठी बाहेरल आली. त्यात मतदाराने मतदान केल्यानंतर चिठ्ठीतून त्याचे मत मांडले आहे.
तसाच प्रकार छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत समोर आला. आता मराठवाड्यातील कोणत्या बुथवरून या चिठ्ठ्या आल्या त्याची माहिती समोर आली नाही. पण मतदारांनी मतदानासोबत त्यांचं खरं मतही चिठ्ठ्याच्या माध्यमातून मांडल्याची चर्चा रंगली. पदवीधरांच्या समस्या काहींनी मांडल्या आहेत. तर आमदाराविषयीचा रोषही या चिठ्ठीतून व्यक्त करण्यात आला आहे. काही चिठ्ठ्यांमधून काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.
