Aroh Welankar: ‘काहीतरी मोठं घडणार’; एकनाथ शिंदे प्रकरणावरील आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदेंच्या अज्ञातवासाबद्दल राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यानेसुद्धा एक ट्विट केलं आहे. 'काहीतरी मोठं घडणार', असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलंय.

Aroh Welankar: काहीतरी मोठं घडणार; एकनाथ शिंदे प्रकरणावरील आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत
Eknath Shinde and Aroh Welankar
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 1:02 PM

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातच बंड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (Shivsena) फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे. मंगळवार सकाळपासूनच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे सध्या मुंबईबाहेर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारसुद्धा आहेत. त्या सर्वांना गुजरातमध्ये ठेवण्यात आलंय. एकनाथ शिंदेंच्या अज्ञातवासाबद्दल राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यानेसुद्धा एक ट्विट केलं आहे. ‘काहीतरी मोठं घडणार’, असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलंय. विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे अचानक गायब झाले. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरोह वेलणकरचं ट्विट-

‘एकनाथ शिंदेंसोबत 12 शिवसेना आमदार अज्ञातवासात असल्याचं वृत्त मराठी वृत्तवाहिन्या देत आहेत. काहीतरी मोठं घडणार असं दिसतंय. गुड मॉर्निंग’, असं ट्विट आरोहने केलं. राजकीय, सामाजिक घडामोडींविषयी आरोह नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे आजच्या राजकीय भूकंपाविषयी केलेलं त्याचं हे ट्विटसुद्धा चर्चेत आलं आहे.

विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे हे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या बंगल्यावर तातडीची बैठक सुरु आहे. दरम्यान, पहाटे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर शरद पवारही दिल्लीत गेल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. एकनाथ शिंदे हे सूरतमध्ये असून त्यांच्यासह असलेल्या आमदारांना अहमदाबादला अमित शाह यांच्या भेटीला आणलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.