Aamir Khan: त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस..; सोनम वांगचूक यांचा आमिर खानला टोला, सांगितलं ‘थ्री इडियट्स’चं सत्य
Aamir Khan: ‘3 इडियट्स’मध्ये आमिर खानने साकारलेली फुंगसूक वांगडूची भूमिका सोनम वांगचूक यांच्यात आयुष्यावर आधारित नसल्याचं आमिर खानने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यावर आता सोनम वांगचूक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटातील फुंगसूक वांगडू हे पात्र लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमिर खानने अलीकडेच या दाव्यावर स्पष्टीकरण देताना सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहितीच नव्हती, असं म्हटलं. आता वांगचूक यांनी आमिरच्या या दाव्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबर प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सोनम वांगचूक यांनी आमिर खानला थेट लक्ष्य न करता ‘गजनी’ या चित्रपटाचा संदर्भ देत मिश्किल टोला लगावला. आमिर आणि माझी भेट झाली होती. इतकंच नाही तर आमच्यात अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चाही झाली होती, असं वांगचूक यांनी स्पष्ट केलं.
“आमिरला शॉर्ट टर्म मेमरी लॉस..”
वांगचूक म्हणाले, “त्यावेळी जेव्हा त्याने म्हटलं की, ‘आम्ही तर भेटलोच नव्हतो,’ तेव्हा नंतर काही व्हिडीओ समोर आले. त्यात तो ‘गजनी’च्या वेशात माझं एक भाषण पाहताना दिसत होता. कदाचित तो गजनीच्या वेशात असल्यामुळे त्याला शॉर्ट-टर्म मेमरी लॉस झाला असावा आणि 15 सेकंदांतच तो विसरला असेल. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण खरं तर आमची भेट खूप सविस्तरपणे झाली होती.”
“मी असं ऐकलंय की तो त्याच्या भूमिकेत पूर्णपणे शिरून जातो. त्यामुळे कदाचित तो गजनीच्या व्यक्तिरेखेत इतका रमला असेल की, मी पुरस्कार स्वीकारलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यालाही तो उपस्थित होता, हेसुद्धा कदाचित तो विसरला असेल. पण खरं सांगायचं तर आमची भेट खूप सविस्तर झाली होती आणि आमच्यात अनेक कल्पनांवर चर्चा झाली होती”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमिरसोबत झालेली चर्चा
सोनम वांगचूक यांनी ‘थ्री इडियट्स’ हा त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक असल्याचा दावा केलेला नाही. मात्र, आमिरसोबत झालेल्या भेटीत काही कल्पना आणि विचारांवर चर्चा झाली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, या चर्चेतील काही कल्पनांचा नंतर चित्रपटाच्या निर्मितीत वेगळ्या पद्धतीने वापर झाला असण्याची शक्यता आहे.
आमिर खानने भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतून काही कल्पना घेतल्या असतील, त्या त्याच्या टीमसोबत शेअर केल्या असतील आणि नंतर त्याच कल्पनांवर वेगळ्या पद्धतीने काम करून चित्रपटाची कथा विकसित केली असेल, असा अंदाज सोनम वांगचूक यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, या कल्पना नेमक्या कुठून आल्या आहेत, याची आमिरच्या सहलेखकांना किंवा दिग्दर्शकाला कदाचित माहिती नसावी, असंही वांगचूक यांनी म्हटलं. त्यांनी याबाबत फारशी आक्षेप नसल्याचंही स्पष्ट केलं. त्यांच्या मते, एखादी कल्पना कलाकाराने चर्चेतून घेतली असेल आणि त्याच्या टीममधील इतरांना त्याचा स्रोत माहीत नसेल, तर त्यात त्यांना विशेष काही वाटत नाही.
आमिर खानने 2008 मध्ये ‘गजनी’ चित्रपटात संजय सिंघानिया ही भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेला अल्पकालीन स्मृती गमावण्याची (शॉर्ट टर्म मेमरी लॉस) समस्या असते. याच व्यक्तिरेखेचा संदर्भ घेत सोनम वांगचूक यांनी आमिरच्या विस्मरणावर विनोद केला.