
मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स) नुकताच जयपूरमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) श्रेणीत साधं नामांकनही न मिळाल्याने प्रसिद्ध गायक सोनू निगमने जाहीर नाराजी व्यक्त केली. राजस्थानमधील जयपूरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या 3’ या चित्रपटातील ‘मेरे ढोलना 3.0’ हे सोनू निगमच्या आवाजातील गाणं तुफान हिट ठरलं होतं. तरीसुद्धा सोनू निगमला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकांच्या श्रेणीत नामांकन मिळालं नाही. यामुळे त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘आयफा’ला उपरोधिक टोला लगावला आहे.
आयफामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकांच्या श्रेणीत अरिजीत सिंग, करण औजला, दिलजीत दोसांझ, बादशाह, जुबिन नौटियाल आणि मित्राज यांना नामांकनं मिळाली होती. त्यापैकी जुबिन नौटियालने हा पुरस्कार जिंकला होता. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर बुधवारी सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नामांकनाच्या यादीचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यावर त्याने उपरोधिकपणे लिहिलं, ‘धन्यवाद आयफा.. अखेर तुम्ही राजस्थानच्या नोकरशाहीला जबाबदार होता.’ इतकंच नव्हे तर या पोस्टच्या बॅकग्राऊंडला त्याने त्याचं ‘ढोलना 3.0’ हे गाणं लावलंय. या गाण्याला किमान नामांकन तरी मिळायला हवं होतं, याकडे त्याने लक्ष वेधलं.
सोनू निगमच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली. संगीतकार अमाल मलिकने लिहिलं, ‘अशा विश्वात आपण राहतोय.. मस्करी बनवून ठेवली आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘तुम्ही अतुलनीय आहात. आमच्यासाठी तुम्हीच संगीत आहात.’ तर ‘सोनू निगम स्वत: एक पुरस्कार आहेत. तुमच्या आवाजाची खोली मोजण्याची त्यांची पात्रता नाही’, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.
सोनू निगमने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिंदी, कन्नड, बंगाली, मराठी, तेलुगू, तमिळ, ओडिया, इंग्रजी, आसामी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाळी, तुलू, मैथिली आणि मणिपुरी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. सोनू निगमने 1992 मध्ये ‘तलाश’ या मालिकेतील ‘हम तो छैला बन गए’ या गाण्यातून करिअरची सुरुवात केली.