छी.. यांना लाज वाटली पाहिजे..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी

नुकत्याच एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सोनू निगमला कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सोनू निगमने दिलेली प्रतिक्रिया पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

छी.. यांना लाज वाटली पाहिजे..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
सोनू निगम, सीजेपी आंदोलन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2026 | 3:18 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उतरले आहेत. मात्र प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या एका प्रतिक्रियेमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. सोनू निगम नुकत्याच एका कार्यक्रमात पोहोचला असता त्याला या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. ‘देशात एक परिस्थिती निर्माण झाली आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे..’, इतकं बोलताच सोनूने त्याला मध्येच थांबवलं. “मी इथे कशासाठी आलोय.. बस्स बस्स..”, असं म्हणत तो पुढे निघून जातो. यापुढेही सोनूला काही विचारण्याचा प्रयत्न केला असता “आता पुरे झालं” असं म्हणत तो विषय तिथेच संपवतो. या व्हिडीओ नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मी सोनू निगमच्या कॉन्सर्टची तिकिटं रद्द करत आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे पाहून स्पष्ट दिसतंय की यांना भीती वाटत आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘छी.. यांसारख्या कलाकारांना लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘यांना बॉयकॉट करा.. सर्वजण विकले जातात’, अशीही कमेंट युजर्सने केली आहे. अझानच्या मुद्द्यावरून इतकं बोलणारा सोनू निगम आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि नीट पेपरफुटीवर का बोलत नाहीये, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

पहा व्हिडीओ-

दरम्यान जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढू लागली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षही एकवटू लागले आहेत. एकाचवेळी आंदोलक आणि विरोधक यांनी चारही बाजूंनी हल्लाबोल केल्यामुळे केंद्र सरकारची कोंढी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर याप्रकरणी पोस्ट लिहित आपली मतं मांडत आहेत. यात आलिया भट्ट, सोनू सूद, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर, सुभाष घई, पूजा भट्ट यांचाही समावेश आहे. तर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us