अमिताभजी त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या..; जया बच्चन यांच्या त्या वक्तव्यानंतर सोनू निगमचा खोचक सल्ला

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी महाकुंभबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावरून आता गायक सोनू निगमने खोचक सल्ला दिला आहे. अमिताभजी, त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे न्या, असं त्याने म्हटलंय.

अमिताभजी त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या..; जया बच्चन यांच्या त्या वक्तव्यानंतर सोनू निगमचा खोचक सल्ला
Sonu NIgam and Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2025 | 12:57 PM

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. प्रयागराजमधल्या संगमचं पाणी प्रदूषित असल्याचा दावा करत त्यांनी चेंगराचेंगरीतील मृतांचे मृतदेह नदीत फेकण्याचा आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे नदीचं पाणी आणखी दूषित झाल्याचं त्यांनी म्हटलंय. जया बच्चन यांनी महाकुंभच्या आयोजनावरूनही सरकारवर प्रश्न उपस्थित केला. इतकंच नव्हे तर महाकुंभला येणाऱ्या भाविकांच्या आकडेवारीबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली. संसदेबाहेर केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगमने जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जया यांचा व्हिडीओ शेअर करत सोनूने चक्क त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे.

महाकुंभमध्ये लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी दररोज पोहोचत आहेत. मात्र याच महाकुंभच्या गैरव्यवस्थापनाबाबत काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत. याविषयी संसद भवनाबाहेर बोलताना जया बच्चन म्हणाल्या, “सध्या सर्वांत जास्त दूषित पाणी कुठे आहे? तर कुंभमेळ्यात.. चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत. यामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाही. कुंभमेळ्याला जाणाऱ्या सर्वसामान्य लोकांना कोणत्याही विशेष सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्ता नाही. पण व्हीआयपी लोकांसाठी सर्व सुविधा आहेत. कोट्यवधी लोक तिथे आल्याचा खोटा दावा केला जातोय. इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे जमू शकतात?”

सोनू निगमने जया यांचा हाच व्हिडीओ त्याच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला. त्यावर त्याने लिहिलं, ‘जया बच्चन यांनी आपलं मानसिक संतुलन गमावलंय. अमिताभजी (त्यांचे पती), त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा.’ या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जया बच्चन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी काहींनी केली आहे.

13 जानेवारीपासून महाकुंभची सुरुवात झाली असून 26 फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा पार पडणार आहे. दुर्दैवाने 29 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 30 जणांनी आपले प्राण गमावले. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत काहींचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत तब्बल दोन कोटींहून अधिक भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं आहे.