Chhath Puja: छट पूजेवरुन सोनू सूदचे मनसेला ओपन चॅलेंज, येत्या रविवारी… मोठा निर्णय
Chhath Puja: गेल्या काही दिवसांपासून छट पूजेवरुन सुरु असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. मनेसेने जुहू बीचवर छठ पूजा साजरी करण्यास विरोध केला आहे. या वादात आता अभिनेता सोनू सूदने उडी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून छट पूजेवरुन सुरु असलेल्या वादात चित्रपट अभिनेता सोनू सूदने एण्ट्री घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत महत्त्वाची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट केले की तो १५ तारखेला संध्याकाळी छठ पूजा साजरी करण्यासाठी जुहू बीचवर उपस्थित राहणार आहेत. मनेसेने जुहू बीचवर छठ पूजा साजरी करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता 15 तारखेला नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जुहू बीचवर छठ पूजा साजरी करण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे. याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदचा व्हिडीओ समोर आला आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे जुहू चौपाटीवरील छठ पूजेच्या आयोजनाबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवरही दबाव निर्माण झाला आहे.
मनसेला छट पूजेसाठी विरोध
मनसेचे कार्यकर्ते कुशल धुरी यांनी आज सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाऊन जुहू चौपाटीवरील छठ पूजेच्या विरोधात अधिकृत तक्रार नोंदवणार असल्याचे जाहीर केले आहे. कुशल धुरी यांची मुख्य मागणी आहे की गिरगाव चौपाटीप्रमाणे जुहू आणि वर्सोवा चौपाटी येथेही छठ पूजेला परवानगी देऊ नये. त्यांच्या मते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांना अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच समुद्रकिनार्याच्या व्यवस्थापनावरही अतिरिक्त भार पडू शकतो.
कुशल धुरी यांनी यापूर्वी उपमहापौर संजय घाडी यांची भेट घेऊनही हीच मागणी मांडली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाने स्थानिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मनसेचे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर छठ पूजेला परवानगी न दिल्याच्या निर्णयाचा हवाला देत जुहू आणि वर्सोवा येथेही समान धोरण अवलंबावे, अशी भूमिका घेत आहेत.
सोनू सूदचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अभिनेत्याच्या उपस्थितीला छठ पूजेच्या पावित्र्याशी जोडले तर काहींनी मनसेच्या विरोधाला राजकीय रंग असल्याचे मत व्यक्त केले. मात्र सोनू सूदने व्हिडीओमध्ये कोणत्याही राजकीय वादविवादात न पडता केवळ छठ पूजेसाठी जुहू बीचवर येण्याची घोषणा केली आहे.