अरिजित सिंगच्या हिंदी गाण्यात अभिनेत्री रिचवते पेगवर पेग, प्रेम विरह अन्… साऊथचा सुपरस्टार आहे नायक
अरिजित सिंगचा हळवा आवाज, ए. आर. रहमान यांचं संगीत आणि धनुष-कृती सेनॉन यांची भावनिक केमिस्ट्री... या गाण्यामध्ये प्रेमाची एक वेगळीच बाजू पाहायला मिळते. तुम्ही पाहिलंय का?

काही चित्रपट असे असतात, ज्यातील गाणी ऐकल्यानंतर नकळत त्या चित्रपटातील प्रेमकहाणी डोळ्यांसमोर उभी राहते. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक प्रेमकहाण्या आणि त्यातील गाणी लोकप्रिय ठरली आहेत. आता याच यादीत धनुष आणि कृती सेनॉन यांच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटातील टायटल ट्रॅकचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला लोकप्रिय गायक अरिजित सिंग याचा आवाज लाभला असून, ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे.
अरिजित सिंगच्या आवाजातील गाण्याची जादू
‘तेरे इश्क में’ या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील भावनिक साद. अरिजित सिंगच्या आवाजातील हळवेपणा आणि गाण्याचे शब्द यामुळे प्रेमातील ओढ, अस्वस्थता आणि वेदना प्रभावीपणे जाणवतात. इरशाद कामिल यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत, तर ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. या तिघांची एकत्रित जादू गाण्यात अनुभवायला मिळते. त्यामुळे हे गाणं ऐकताना त्यातील भावना थेट मनाला भिडतात.
गाण्याच्या व्हिडीओमध्ये धनुष आणि कृती सेनॉन यांची वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळते. सुरुवातीला प्रेमात असलेली ही जोडी पुढे भावनिक संघर्षातून जाताना दिसते. धनुषचा आक्रमक अंदाज आणि कृती सेनॉनच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या वेदना गाण्याला वेगळाच अर्थ देतात. कृती सेनॉन संपूर्ण व्हिडीओमध्ये मद्याच्या आधाराने आपल्या भावना विसरण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळे ही केवळ प्रेमाची गोष्ट नसून, नात्यातील दुरावा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वेदनांचीही झलक दाखवते.
चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संगीत
‘तेरे इश्क में’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी ‘रांझणा’ या चित्रपटातून एक वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली होती. त्या चित्रपटातही धनुषने मुख्य भूमिका साकारली होती. आता ‘तेरे इश्क में’च्या निमित्ताने धनुष आणि आनंद एल. राय ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलेली पाहायला मिळाली होती. चित्रपटातील संगीताची जबाबदारी ए. आर. रहमान यांनी सांभाळली होती, इरशाद कामिल यांच्या शब्दांनी गाण्याला खूप भावनिक बनवलं आहे.