एका दिवसात शूट झालेलं हे गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की आजही लोक ऐकू येताच धरतात ठेका

श्रीदेवी यांचं गाणं, जे एका दिवसात झालं होतं शूट. शूट होताच तोडण्यात आलेला संपूर्ण सेट. गाण्याचं शेवटचं शूटिंग एका भिंतीवर झालं पूर्ण. गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.

एका दिवसात शूट झालेलं हे गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की आजही लोक ऐकू येताच धरतात ठेका
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 14, 2026 | 4:29 PM

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण झाली की त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांसोबतच त्यांचा दमदार डान्सही डोळ्यासमोर येतो. मात्र, ‘नगीना’ चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा’ हे गाणं आजही विशेष लक्षात राहते. श्रीदेवींचा नागिन अवतार, त्यांचे जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि सरोज खान यांची भन्नाट कोरिओग्राफी यामुळे हे गाणं अजरामर झाले.

विशेष म्हणजे, या गाण्याच्या शूटिंगमागची कहाणी पडद्यावर दिसणाऱ्या जादूपेक्षाही रंजक आहे. चित्रपटाचे जवळपास संपूर्ण शूटिंग पूर्ण झाले होते आणि फक्त हे एक गाणे शूट करणे बाकी होते. त्यासाठी निर्मात्यांकडे फक्त एक दिवसाचा वेळ होता. त्याच दिवशी संध्याकाळी शूटिंगचे सेट तोडण्यात येणार होते.

श्रीदेवी सकाळी 6.30 वाजताच पोहोचल्या

दिग्दर्शक हरमेश मल्होत्रा यांनी संपूर्ण टीमला चित्रपटाचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले होते. आता दुसऱ्या दिवशी केवळ या गाण्याचे शूटिंग करायचे होते. कोरिओग्राफर सरोज खान यांनाही त्यासाठी बोलावण्यात आले होते.

सरोज खान यांनी श्रीदेवींना सकाळी 7 वाजता सेटवर पोहोचण्यास सांगितले होते. मात्र, शूटिंगबाबत श्रीदेवी किती शिस्तप्रिय आणि समर्पित होत्या, याचा अंदाज यावरून येतो की त्या ठरलेल्या वेळेच्या तब्बल अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 6.30 वाजताच सेटवर पोहोचल्या. त्यानंतर गाण्याच्या शूटिंगला सुरुवात झाली. श्रीदेवी कॅमेऱ्यासमोर आपल्या डान्स परफॉर्मन्समध्ये व्यस्त होत्या. मात्र, दुसऱ्या बाजूला सेट तोडण्याचे कामही सुरू झाले होते.

एका बाजूला शूटिंग, तर दुसऱ्या बाजूला सेट तोडण्याचे काम

एकीकडे ‘मैं तेरी दुश्मन’ या गाण्यासाठी कॅमेरे सुरू होते तर दुसरीकडे सेट हळूहळू हटवला जात होता. शूटिंग जसजसे पुढे जात होते, तसतसा सेटचा मोठा भाग तोडून हटवला जात होता.

शूटिंग संपेपर्यंत सेटचा जवळपास संपूर्ण भाग हटवण्यात आला होता. अखेरीस सेटवर केवळ एक भिंत शिल्लक राहिली आणि याच भिंतीसमोर गाण्याचे उर्वरित शूटिंग पूर्ण करण्यात आले.

सरोज खान यांच्या प्रभावी कोरिओग्राफीला श्रीदेवींच्या जबरदस्त परफॉर्मन्सची साथ मिळाल्याने ‘मैं तेरी दुश्मन’ हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लक्षात राहिलेल्या डान्स नंबरपैकी एक ठरले. आजही या गाण्याचा उल्लेख झाला की श्रीदेवींचा तो नागिन अवतार आणि त्यांचा जबरदस्त डान्स चाहत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us