Star Pravah : दुष्काळी परिस्थितीचं भान राखत ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय, सतीश राजवाडे म्हणाले, लोकप्रिय गोष्ट थांबवण्याचा…

Satish Rajwade : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचं भान राखत स्टार प्रवाहनं मोठा निर्णय घेतला असून याबद्दल सतीश राजवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Star Pravah : दुष्काळी परिस्थितीचं भान राखत स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, सतीश राजवाडे म्हणाले, लोकप्रिय गोष्ट थांबवण्याचा...
| Updated on: Oct 27, 2026 | 6:48 PM

 

 

Loading...

महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी चर्चेचं कारण आहे ते या कार्यक्रमाच्या टीमने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय! स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाणाच्या पाचही पर्वात ‘साडे माडे शिंतोडे’ ही फेरी फारच गाजली. गाणी न ओळखल्यास पाण्याचा होणार वर्षाव या फेरीची खासियत. कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकांनीही या फेरीला भरभरुन प्रेम दिलं. मात्र महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती पहाता आता होऊ दे धिंगाणाच्या टीमने ही फेरी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शूटिंगच्या यापुढील टप्यात ही फेरी शूट होणार नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना सामाजिक परिस्थितीचं भान राखत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टीमकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

 

या निर्णयाबद्दल स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहेच; पण त्याचबरोबर आपण ज्या समाजाचा भाग आहोत, त्या समाजातील परिस्थितीचं भान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ‘साडे माडे शिंतोडे’ ही फेरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. मात्र, सध्याची महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने ही फेरी थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एखादी लोकप्रिय गोष्ट थांबवण्याचा निर्णय घेणं सोपं नसतं; पण समाजहिताचा विचार करताना कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात. मनोरंजनातून आनंद देताना सामाजिक संवेदनशीलतेचं भान जपणं हीच स्टार प्रवाहची भूमिका आहे.’

 

आता होऊ दे धिंगाणाचा लाडका होस्ट सिद्धार्थ जाधव म्हणाला, ‘आता होऊ दे धिंगाणा मधील साडे माडे शिंतोडे ही फेरी माझ्यासह संपूर्ण टीमसाठी खूप खास होती. या फेरीतून आम्ही सगळ्यांनीच खूप धमाल केली आणि प्रेक्षकांनीही तिला भरभरून प्रेम दिलं. पण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचं महत्त्व लक्षात घेणं ही आपली जबाबदारी आहे. मनोरंजन करताना सामाजिक भान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापुढील भागांमध्ये ही फेरी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पाणी ही आपली अमूल्य संपत्ती आहे आणि त्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मनोरंजनातूनही आपण समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतो यावर माझा विश्वास आहे.’

 

प्रेक्षकांना खळखळून हसवताना समाजाप्रती असलेलं भान जपण्याचा ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या टीमचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us