
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या 38व्या वर्षी तिने मीरा रोड येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. प्रिया गेल्या कित्येक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. 31 ऑगस्टरोजी तिची ही झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर आता 13 दिवसांनी त्याने प्रियाच्या आठवणीत आणखी एक पोस्ट लिहिली आहे.
काय आहे पोस्ट?
“दुर्दैवाने प्रियाचे वडील म्हणजे माझे सुहासकाका खूप लवकर गेले. तिचं जाणं तिची आई, शंतनू आणि मोठा भाऊ विवेक यांच्यासाठी ते जास्त धक्कादायक असेल कारण त्यांच्यासोबत तिचा जास्त सहवास होता. दुर्दैवाने तिचे वडील म्हणजे सुहास काका ती खूप लहान असताना गेला. तो आमच्या घरी येणार म्हटलं की चैतन्याचं वातावरण असायचं. खेळकर, उत्साही, स्वतःला कामात झोकून देणारा. त्याने ठाण्यात ‘प्रिया कॉफी हाऊस’ सुरू केलं होतं. सुहास काकाचे अनेक गुण प्रियात होते. तिचा भाऊ विवेक आणि मी एका वयाचे तर ती माझ्यापेक्षा १२ वर्षाने लहान. माझं १० विचं शिक्षण होतं तेव्हा त्यांच्याघरी जाणं कमी होत गेलं. पण ती लहानपणापासूनच खूप गोड, समंजस, हसरी आणि सगळ्यांशी मिळून वागणारी होती.”
कळत नकळत मालिकेत आम्ही पहिल्यांदा एकत्र
पुढे तो म्हणाला, “कळत नकळत मालिकेत आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं तेव्हा मी निगेटिव्ह भूमिका करत होतो आणि तिला जाळ्यात ओढतो असा तो रोल होता. तेव्हा मी तिला म्हणालो होतो की, ‘प्रिया तू का हा रोल स्वीकारलास एकदा बघायचस तरी ती भूमिका कोण करत आहे’ तेव्हा ती मला म्हणाली होती की, ‘दादा, आपण आपलं नातं विसरून जी काही भूमिका आहे ती करू!’. त्यानंतरही आम्ही दोन तीन मालिका एकत्र केल्या. तिला आजारपण उद्भवलं तेव्हा तीने जिद्दीने त्यावर मात करून पुन्हा उभी राहिली.”
“मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं”
“आम्ही शेवटच्या मालिकेत पुन्हा एकत्र काम केलं तेव्हा मला खूप बरं वाटलं होतं. तिचं स्क्रिप्ट तोंडपाठ असायचं, एक कलाकार म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं. आजारपणात माणसं खचतात पण मी तिला तसं कधीच पाहिलं नाही. स्मिता तळवलकर, रसिका जोशी आणि प्रिया लढाऊ होत्या ज्या आजाराशी लढून परत आल्या होत्या. पण शेवटी प्रिया सेटवर यायची बंद झाली तेव्हा मला त्याबद्दल कळलं होतं. मी तिला अनेकदा मेसेज करायचो पण तिला भेटायचं नव्हतं. ती उत्तर द्यायची नाही तेव्हा मला कळलं की तिला त्याबद्दल बोलायचं नव्हतं. ती परत येईल असा मला विश्वास होता ती लढली पण त्या कॅन्सरने तिचा घास घेतला” असे सुबोध भावे पुढे म्हणाला.
सुबोध भावे आणि प्रिया मराठे हे यांच्यात जवळचे नाते होते. प्रिया सुबोधची चुलत बहीण. त्यामुळे प्रियाच्या मृत्यूनंतर सुबोधला धक्का बसला आहे. तिच्या आठवणीत तो पोस्ट शेअर करताना दिसतो.