Govinda: अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे गोविंदा पडला एकटा; कृष्णा-कश्मीरासोबत सुनिता अहुजाची पार्टी
कृष्णा आणि कश्मीरा यांनी सुनितासोबत पुन्हा जवळीक साधली असून, आता त्यांच्यात कौटुंबिक नात्याची ऊब पाहायला मिळत आहे. मात्र, गोविंदा या पार्टीत अनुपस्थित असल्याने आणि त्याच्या नावाचा प्रश्न टाळल्याने या कुटुंबातील समीकरणांबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.

Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईतील एका पार्टीत ती अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्यासोबत दिसली. विशेष म्हणजे, या पार्टीदरम्यान पापाराझींनी गोविंदाबाबत प्रश्न विचारला, मात्र सुनीता आणि कृष्णा-कश्मीरा यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. पार्टीमध्ये सुनिता आहुजासोबत तिचा मुलगा यशवर्धनही दिसला. यावेळी कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांच्यासोबत त्यांची भेट झाली. कश्मीराने सुनिताला पाहताच मिठी मारली आणि तिच्या गालावर किसही केलं. सुनितानेही कश्मीरासोबत प्रेमाने संवाद साधला. दोघींमधील हा आपुलकीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली.
कधीकाळी सुनिता आहुजा आणि कश्मीरा शाह यांच्यातही मोठा वाद झाला होता. मात्र, आता दोघींमधील संबंध सुधारल्याचं दिसत आहे. यापूर्वी ‘लाफ्टर शेफ्स 3’च्या सेटवरही सुनिता, कृष्णा आणि कश्मीरा यांचं भावनिक पुनर्मिलन झालं होतं. कृष्णाने सुनिताची माफी मागितली होती, तर कश्मीरानेही तिच्याप्रती आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
‘मामा कुठे आहेत?’ प्रश्नावर तिघांचंही मौन
पापाराझींनी सुनिता आहुजा आणि कृष्णा अभिषेक यांना पाहून, ‘मामा कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नावर सुनिता, कृष्णा किंवा कश्मीरा यांच्यापैकी कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट तिघांनीही हा प्रश्न टाळत फोटोसाठी पोझ दिली. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गोविंदा आणि सुनिता यांच्या वैवाहिक नात्याबाबत सध्या विविध चर्चा सुरू आहेत. सुनिताने यापूर्वी काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोविंदाबाबत भाष्य केलं आहे. अलीकडेच गोविंदाचं सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारशी नाव जोडलं गेल्यानंतरही हा विषय चर्चेत आला. या प्रकरणात कश्मीरा शाहने सुनिताला सार्वजनिकपणे पाठिंबा दिला होता.
कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्या कुटुंबातील वाद अनेक वर्षे चर्चेत होता. 2016 पासून दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं वृत्त होतं. कृष्णाच्या काही विनोदी वक्तव्यांमुळे गोविंदा नाराज झाला होता, तर कश्मीरा शाहच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुनिता आणि कश्मीरा यांच्यातही तणाव निर्माण झाला होता. मात्र आता गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सर्व कुटुंब एकत्र आलं आणि गोविंदाच एकटा पडल्याचं चित्र दिसत आहे.
