
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या संपत्तीचा वाद सतत चर्चेत आहे. आता संजय कपूरची बहीण मंधिरा कपूरने वहिनी प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंधिराने भावाच्या कंपनीतून आई आणि वहिनीला किती पैसे मिळतात, याविषयीचा खुलासा केला. संजयच्या निधनानंतरही त्याची आई राणी कपूरचा सर्व वैयक्तिक खर्च आधीसारखाच उचलला जातो आणि त्यांना दर महिन्याला 21 लाख रुपये मिळत असल्याचा दावा प्रियाने कोर्टातील सुनावणीदरम्यान केला होता. त्यावर आता मंधिराने म्हटलंय की, स्वत: प्रिया दर महिन्याला जवळपास 5 कोटी रुपये घेते.
संजयच्या निधनानंतरही त्याच्या आईला दर महिन्याला कंपनीकडून 21 लाख रुपये मिळतात आणि त्यांचा सर्व वैयक्तिक खर्च आधीसारखाच उचलला जातो, असं स्पष्टीकरण प्रियाच्या वकिलांनी कोर्टात दिलं होतं. संजय हयात असताना ज्याप्रकारे खर्च सांभाळले जात होते, तसेच आताही सांभाळले जात असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यावरून आता संजयच्या बहिणीने तिची बाजू मांडली आहे.
“रक्ताची नाही आणि बाहेरची माणसं यांमध्ये खूप फरक असतो. जेव्हा माझे वडील जिवंत होते, तेव्हा माझ्या आईला खूप काही मिळत होतं. माझा भाऊ जिवंत असतानाही तिला ते सर्वकाही मिळत होतं. दुर्दैवाने प्रियाला काय मिळतंय, याची माहिती तिने कधीच घेतली नव्हती. आता आम्ही सर्वकाही तपासतोय. माझ्या आईला फक्त 12 लाख रुपये प्रति महिना मिळत आहेत. ही लज्जास्पद बाब आहे, कारण तिला दिली जाणारी रक्कम 21 लाख असली तरी सर्व टॅक्स कापल्यानंतर तिला 13 लाख रुपयेच मिळायचे. ते आता 12 लाखांवर आलं आहे”, असं मंधिरा म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “पण बाहेरच्या माणसाला दर महिन्याला जवळपास 3 ते 5 कोटी रुपये मिळत आहेत. कारण तिला फक्त एका कंपनीकडूनच एक कोटी रुपये मिळतात आणि आता तिने सर्व गोष्टींवर आपला ताबा मिळवला आहे. तिला पाच कोटी रुपये मिळत आहेत आणि ज्या व्यक्तीने ती कंपनी बनवली, म्हणजेच माझ्या आईला 12 लाख दिले जात आहेत. ती कोणावर कसलेच उपकार करत नाहीये. हे पैसे कंपनीकडून मिळत आहेत. तिला असं वाटतंय का की ती माझ्या आईची काळजी घेतेय? ती आमच्या कुटुंबाचा किंवा या कंपनीचा चेहरा नाही. खरंतर तिने त्या कंपनीच्या आसपाससुद्धा राहू नये.”
सध्याच्या घडीला करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान हे प्रिया सचदेवविरोधात संजय कपूरच्या संपत्तीवरून कोर्टात लढत आहेत. प्रियाने सादर केलेलं संजयचं मृत्यूपत्र खोटं आणि बनावट असल्याचा दावा त्यांनी याचिकेद्वारे केला आहे.