Karan Deol | सनी देओलचा मुलगा बोहल्यावर चढण्यास सज्ज; ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

करणने ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो ‘अपने के अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

Karan Deol | सनी देओलचा मुलगा बोहल्यावर चढण्यास सज्ज; या दिवशी बांधणार लग्नगाठ
Karan and Sunny Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2023 | 1:26 PM

मुंबई : देओल कुटुंबात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. कारण दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. करण देओल त्याची गर्लफ्रेंड दृशा रॉयशी लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. आता करण आणि दृशाच्या लग्नाची तारीख ठरल्याची माहिती समोर येत आहे. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे आणि इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी उपस्थित असतील. करणच्या साखरपुड्याचं वृत्त समोर येताच त्याची होणारी पत्नी आणि देओल कुटुंबाची होणारी सून कोण आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 16 जून पासून करणच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तर 18 जून रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. सनी देओलप्रमाणेच करणसुद्धा त्याच्या खासगी आयुष्याविषयी माध्यमांसमोर फारसा व्यक्त होत नाही. त्यामुळे लग्नाबाबत अद्याप त्याची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. करण आणि दृशाचं हे लग्न मुंबईतच पार पडणार आहे. करण आणि दृशा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. हे दोघं गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

दृशा रॉय ही फॅशन डिझायनर असून करणप्रमाणेच तीसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे. तिचे पणजोबा बिमल रॉय हे महान भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. बिमल रॉय यांचे चित्रपट वास्तववादी आणि समाजवादी विषयांसाठी ओळखले जायचे. दो बिघा जमीन, परिणीता, देवदास, मधुमती, सुजाता, पारख आणि बंदिनी यांसारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

करणने ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो ‘अपने के अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्रसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.