
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’ या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या काही दिवसांत कमाईत आणखी चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. यातील सस्पेन्स आणि थ्रिलसोबतच अॅक्शनचीही जोरदार चर्चा झाली होती. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो सस्पेन्स आणि रोमांचकता याबाबतीत ‘कांतारा’लाही टक्कर देणारा आहे. आयएमडीबीवरही त्याला जबरदस्त रेटिंग मिळाली आहे.
ज्या चित्रपटाविषयी आम्ही सांगतोय, त्याचं नाव आहे ‘वडा चेन्नई’. 17 ऑक्टोबर 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये साऊथ सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या राजेश यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता सात वर्षे होत आली आहेत. परंतु तरीही त्याची चर्चा काही कमी झाली नाही. धनुषने त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. या चित्रपटातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तुम्हाला हा चित्रपट पहायचा असेल तर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर तो उपलब्ध आहे.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वडा चेन्नई’ या तमिळ चित्रपटाची कथा एका प्रतिभावान कॅरमपटू ‘अन्बू’च्या अवतीभवती फिरते. घराची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तो गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवतो आणि हळूहळू स्थानिक माफियांच्या संघाचा भाग बनतो. परंतु ज्यावेळी अन्बूला समजतं की ते माफियाच त्याच्या स्वत:च्या परिसराला उद्ध्वस्त करण्याचा कट रचत आहेत, तेव्हा कथेच मोठा ट्विस्ट येतो. या चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा त्यातील सस्पेन्स अधिक गडद होत जातो.
रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’पेक्षा मागे नाही. ‘कांतारा’ला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाली, तर ‘वडा चेन्नई’ला 8.4 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच रेटिंगच्या बाबतीत ‘वडा चेन्नई’ पुढे आहे. आयएमडीबीवर प्रेक्षकच चित्रपट किंवा सीरिज पाहिल्यानंतर रेटिंग देतात. दहापैकी सर्वाधिक रेटिंग मिळाली म्हणजे तो चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वेत्रिमारन यांनी केलंय. यामध्ये धनुष आणि ऐश्वर्या राजेश यांच्याशिवाय डॅनियल बालाजी आणि अँड्रिया जेरेमिया यांच्याही भूमिका आहेत.