कोंबडीच्या पिसांसारखं.., नव्या हेअरस्टाइलमुळे प्राजक्ता गायकवाड तुफान ट्रोल; अखेर भावाने सांगितलं खरं कारण

मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या हेअरस्टाइलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. प्राजक्ताची ही हेअरस्टाइल पाहून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यावर आता तिच्या भावाने उत्तर दिलं आहे.

कोंबडीच्या पिसांसारखं.., नव्या हेअरस्टाइलमुळे प्राजक्ता गायकवाड तुफान ट्रोल; अखेर भावाने सांगितलं खरं कारण
Prajakta Gaikwad
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 4:16 PM

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या लूकमुळे तुफान चर्चेत आली आहे. प्राजक्ताने नवीन हेअरकट केला असून या नव्या लूकमध्ये ती अत्यंत वेगळी दिसून येत आहे. परंतु प्राजक्ताचा हा लूक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. अनेकांनी तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर कमेंट्स करत टीका केली आहे. ‘हे काय कोंबडीच्या पिसांसारखं..’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ही हेअरस्टाइल अजिबात शोभून दिसत नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय. प्राजक्ताच्या व्हिडीओवर नकारात्मक कमेंट्सचा पाऊस पाहून अखेर तिच्या भावाने त्यामागील खरं कारण सांगितलं आहे.

प्राजक्ताच्या भावाची पोस्ट-

‘नमस्कार मी ओम यादव, प्राजक्ता ताईचा भाऊ. प्राजक्ता ताईच्या हेअरस्टाइलविषयी..’ असं लिहित त्याने तीन मुद्दे मांडले आहेत. ‘1- ती हेअरस्टाइल शोभत नाही, चला हे तुमचं म्हणणं मान्य करू. पण तिच्या एका चित्रपटाचं शूटिंग चालू असल्याने दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार, कथेच्या मागणीनुसार तशी हेअरस्टाइल केलेली आहे याची नोंद घ्यावी. ताईने काय स्वइच्छेने केलेलं नाही. 2- ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका केल्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात येसूबाई यांची एक आदराची भावना आणि प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे हेअरस्टाइल बदलली गेल्याने आपण सर्वच गडबडलो. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया आणि भावनेचा मी आदर करतो. पण आपण ताईच्या करिअरच्या गोष्टीबाबतही आदर करुयात की. तिलाही वैयक्तिक आयुष्य आहे. थोडा संयम ठेवुयात,’ असं त्याने लिहिलंय.

त्याने पुढे म्हटलंय, ‘3- ताईच्या त्या चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे, त्यामुळे आता केस वाढवून परत पहिल्यासारखं एक-दोन महिन्यात होतीलच की. त्यात एवढं ट्रोल करण्यासारखं काय आहे? राहिला विषय ट्रोलिंगचा तर ताई एक पण कमेंट वाचत नाही. ट्रोलिंग सहन करणं ही काय नवीन गोष्ट नाही. शेवटी अशा कला क्षेत्रात आम्ही आहोत की पब्लिक आपलं चांगलं वाईट मत व्यक्त करत राहणार. आपल्या सर्वांचा आदर आहे, तिचाही करा एवढंच.’ प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांना तिच्या भावाने सडेतोड उत्तर दिलं आहे. या ट्रोलिंगवर अद्याप प्राजक्ताने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

Follow Us