‘तारक मेहता..’मधील रोशन सोढी बेपत्ता असल्याप्रकरणी पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती
'तारक मेहता..' या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग सोमवारपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी त्याच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग सोमवारपासून बेपत्ता आहे. गुरूचरण सध्या कुठे आणि कोणासोबत आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही. तो दिल्लीत राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटायला गेला होता. तिथून तो मुंबईला परतलाच नाही. 22 एप्रिलपासून गुरूचरणबद्दल कोणतीच माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली नाही. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोहित मीना म्हणाले, “गुरूचरणच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली आहे की तो 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. तो दिल्लीहून मुंबईला जाणार होता. पण तो तिथे पोहोचलाच नाही. आम्ही आयपीसीच्या कलम 365 अंतर्गत केस दाखल केली आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी आम्ही एक टीम नेमली आहे आणि आमची टेक्निकल टीमसुद्धा याप्रकरणी काम करत आहे. आम्ही सीसीटीव्हीची तपासणी करत आहोत, ज्यामध्ये तो एकटाच चालताना दिसून येत आहे.”
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय की गुरूचरण हा रात्री 9.14 वाजता दिल्लीत एकटाच चालतोय. पालम परिसरातील परशुराम चौकमध्ये तो चालताना दिसून आला. यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅगसुद्धा आहे. याप्रकरणी पोलीस त्याच्या बँकेचीही माहिती घेत आहे. गुरूचरण बेपत्ता असल्याप्रकरणी सीसीटीव्हीशिवाय अद्याप पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले नाहीत. त्याचा फोनसुद्धा बंद आहे. गुरूचरणवर कोणता मानसिक दबाव नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना गुरूचरणच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तो त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अनेकदा दिल्लीला येत असतो. जेव्हा कधी तो दिल्लीत येतो, तेव्हा लहान मुलांशी हसतखेळत बोलतो, त्यांच्यासोबत फोटो काढतो, असंही त्यांनी सांगितलं. गुरूचरण हा गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता..’ मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने या मालिकेचा निरोप घेतला. रोशन सिंगची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.