‘तारक मेहता..’साठी घरातून पळून मुंबईत पोहोचला 16 वर्षांचा मुलगा; निर्माते म्हणाले ‘स्वप्नांसाठी..’

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याच्या इच्छेने 16 वर्षांचा एक मुलगा मध्य प्रदेशातून मुंबईला पळून आला होता. यावर आता मालिकेच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तारक मेहता..साठी घरातून पळून मुंबईत पोहोचला 16 वर्षांचा मुलगा; निर्माते म्हणाले स्वप्नांसाठी..
तारक मेहता का उल्टा चष्मा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2026 | 8:07 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत छोटी तरी भूमिका साकारायला मिळावी, अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. याच इच्छेखातर 16 वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबीयांना काहीच न सांगता मध्य प्रदेशातून थेट मुंबईत येऊन पोहोचला. छिंदवाडा इथला हा मुलगा ‘तारक मेहता..’मध्ये काम करण्याच्या उद्देशाने घरातून पळून 900 किलोमीटर दूर मुंबईला आला. यावर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छिंदवाडा इथं राहणारा हा मुलगा 6 ऑगस्ट रोजी दुपारी शाळेत जाण्याच्या बहाण्याने त्याच्या घरातून निघाला होता. मात्र शाळेत जाण्याऐवजी तो थेट रेल्वे स्थानकावर पोहोचला. तिथून आधी तो नागपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला आणि त्यानंतर नागपूरहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईतील गोरेगाव स्थानकावर उतरल्यानंतर तो थेट फिल्म सिटीकडे निघाला. ‘तारक मेहता..’च्या टीमला भेटण्यासाठी तो फिल्म सिटीच्या दिशेने निघाला होता.

पोलिसांनी कुटुंबीयांना दिली माहिती

जेव्हा गोरेगावमधल्या पोलिसांच्या मोबाइल युनिटला या मुलाविषयीची माहिती समजली, तेव्हा त्यांनी लगेचच त्याला आरे पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांच्या चौकशीदरम्यान संबंधित मुलाने प्रामाणिकपणे कबुली दिली की त्याला फक्त ‘तारक मेहता..’ या आवडत्या मालिकेत काम करायचं आहे आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला आला होता. पोलिसांनी छिंदवाडामधल्या त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत मुलाविषयीची माहिती दिली. त्याच्या आईवडिलांनी आधीच तिथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुलाचे वडील मुंबईला पोहोचले आणि पोलिसांनी सुरक्षितरित्या त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं.

काय म्हणाले निर्माते?

या घटनेवर प्रतिक्रिया देताना निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, “तरुणांमध्ये मनोरंजन क्षेत्राबद्दलची अशी आवड पाहून आनंद होत असला तरी स्वप्नांचा पाठपुरावा करताना सावधगिरी आणि जबाबदारी आवश्यक आहे. मोठी स्वप्ने बघा, आपल्या आवडीच्या गोष्टी करा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करा. पण नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा स्वप्नाइतकाच महत्त्वाचा आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना अंधारात ठेवून असा मोठा धोका कधीही पत्करू नये. तुमचा अभ्यास, तुमची सुरक्षितता आणि पालकांचा विश्वास हे तुमचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. असं कोणतंही पाऊल कधीही उचलू नका, ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा कुटुंब अडचणीत येईल. तुमच्या स्वप्नांबद्दल नेहमी पालकांसोबत चर्चा करा, त्यांना तुमच्या निर्णयांमध्ये सहभागी करून घ्या आणि योग्य मार्गाचं अनुसरण करा.”

याविषयी ते पुढे म्हणाले, “तारक मेहता.. या मालिकेनं नेहमीच नवीन आणि तरुण कलाकारांना प्रगती करण्याची संधी दिली आहे. जेव्हा योग्य तयारी, संयम आणि योग्य मानसिकता यांचा मिलाफ होतो, तेव्हा प्रतिभेला नक्कीच ओळख मिळते. जर तुम्हाला आमच्या मालिकेत काम करायचं असेल तर कृपया तुमच्या पालकांच्या उपस्थितीत आमच्या अधिकृत कास्टिंग टीमशी संपर्क साधा.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us