‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्याने मालिकाच नाही तर देशही सोडला; समोर आलं मोठं कारण
काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला रामराम केला होता. आता या अभिनेत्याने देशसुद्धा सोडलं आहे. परदेशात तो कशा पद्धतीने राहतोय, त्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यांच्या जागी नव्या कलाकारांची एण्ट्री झाली. तरीही मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतून बाहेर पडलेल्या एका कलाकाराने आता देशसुद्धा सोडल्याची माहिती समोर येत आहे. या अभिनेत्याने तब्बल 16 वर्षांपासून मालिकेत काम केलं होतं. त्याच्या एक्झिटबद्दल समजताच चाहतेसुद्धा निराश झाले होते. या अभिनेत्याचं नाव आहे कुश शाह. त्याने ‘तारक मेहता..’मध्ये गोलीची भूमिका साकारली होती. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने मालिकेला रामराम केला होता.
‘तारक मेहता..’ सोडल्यानंतर कुश न्यूयॉर्कला स्थलांतरित झाला. एका पॉडकास्टमध्ये त्याने याबद्दलची माहिती दिली. न्यूयॉर्कमध्ये तो सध्या काय करतोय आणि कसा राहतोय, याविषयी तो या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. तो म्हणाला, “मी न्यूयॉर्कमध्ये सध्या एकटाच राहतोय. माझ्यासोबत जी व्यक्ती राहायला येणार होती, ती आली नाही. त्यामुळे पूर्ण रुम सध्या मीच वापरतोय. इथे एकटं राहणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. इथे एकटं राहिल्यावर मला समजलंय की बेडवर जेवल्याने झुरळ येतात. बऱ्याच आठवड्यांनंतर मला समजलं की त्यांच्यापासून आपली सुटका कशी करायची? मला हेसुद्धा समजलंय की याआधी मी किती घाणेरड्या प्रकारे राहत होतो.”
View this post on Instagram
“न्यूयॉर्कमध्ये येऊन मी खूप सुधारलो आहे. आता मी स्वच्छ आणि चांगले कपडे परिधान करू लागलो आहे. आईवडिलांसोबत राहत असताना आयुष्य किती कठीण आहे, हे समजत नव्हतं. मी रात्री बेडवरच जेवत होतो. झोपण्यापूर्वी जेवणाची भांडीसुद्धा तशीच बेसिनमध्ये ठेवायचो. आता घरातून बाहेर पडल्यानंतर मला सगळी कामं करावी लागत आहेत. आता मी स्वत:च घरातली सगळी कामं करतो”, असं त्याने सांगितलं. त्याचसोबत न्यूयॉर्कमधील भिकारी आणि बेघर लोकांबद्दल भीती वाटत असल्याचंही तो म्हणाला. अशी लोकं तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतात, माझ्यावर एकाने असाच हल्ला केला होता, असाही खुलासा कुशने केला. भारताबाहेर राहणं किती आव्हानात्मक असतं, हे कुशला समजू लागलं आहे.
