असित मोदीवर आरोप करणाऱ्या मिसेस सोढीकडे नाहीत पैसे, मनातील खदखद व्यक्त करत जेनिफर मिस्त्री म्हणाली

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, या मालिकेचे निर्माते आता मोठ्या वादात सापडले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत एका महिला कलाकाराने गंभीर आरोप हे केले आहेत.

असित मोदीवर आरोप करणाऱ्या मिसेस सोढीकडे नाहीत पैसे, मनातील खदखद व्यक्त करत जेनिफर मिस्त्री म्हणाली
| Updated on: May 19, 2023 | 6:01 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारक मेहता मालिकेला आता 15 वर्ष पुर्ण होतील. तारक मेहता का उल्टा चष्मा फक्त मालिकाच नाही तर मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांचे जबरदस्त असे प्रेम मिळताना दिसते. मालिकेतील कलाकारांनी तगडी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून अनेक सामाजिक संदेश देखील दिले जातात. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये मुंबईतील (Mumbai) गोकुळधाम सोसायटी ही दाखवण्यात आलीये.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी हे प्रचंड चर्चेत आहेत. फक्त चर्चेतच नाही तर ते वादाच्या मोठ्या भोवण्यात देखील अडकले आहेत. असित कुमार मोदी यांच्यावर मिसेस सोढी अर्थात अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने असित मोदीवर लावलेल्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का हा बसलाय.

जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने थेट लैंगिक शोषणाचा आरोप हा असित मोदी यांच्यावर लावला आहे. मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तिने तक्रार देखील दाखल केली आहे. नुकताच जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने मोठे खुलासे केले आहेत.

जेनिफर मिस्त्री बंसिवाल म्हणाली की, मला वाटले होते, माझे सहकारी कलाकार देखील मला या प्रकरणात सपोर्ट करतील. परंतू तसे अजिबातच दिसत नाहीये. मात्र, प्रत्येकाची कारणे विविध आहेत. मी सुरूवातीला लैंगिक शोषण हा शब्द म्हणण्यास घाबरत होते. मात्र, पंधरा वर्षांमध्ये माझ्यासोबत काय घडले ते माझ्या वकिलांनी मला सविस्तर लिहिण्यास सांगितले आणि ते सर्व लैंगिक शोषण असल्याचेच म्हटले.

मी आता लैंगिक शोषण या शब्दाला घाबरत नाही. मी मार्चमध्ये शेवटचा एपिसोड शूट केला. मात्र, मला अजूनही माझ्या कामाचे पैसे हे मिळाले नाहीत. माझे बऱ्याच महिन्याचे पैसे त्यांच्याकडे थकीत आहेत आणि ती रक्कम अत्यंत मोठी आहे. तुम्हाला खोटे वाटेल, मात्र, आता माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये 1 लाख रूपये देखील नाहीत.

माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये आता फक्त 80 हजार रूपये आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये सात मुली असून त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे. मात्र, आता मी फार काही या गोष्टींचा विचार करत नाही. कारण देवाने तोंड दिले आहे तर अन्नही देईलच. मी या सर्व गोष्टींना फार जास्त थकले होते. मला माझ्या देवावर विश्वास आहे.