थलापती विजय ला ‘थलापती’ का म्हणतात? 32 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
थलपति विजय लवकरच तमिलनाडुचा मुख्यमंत्री होणार आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष TVK हा आघाडीवर असून त्याचे खरे नाव जोसेफ विजय आहे. पण त्याला थलपति का म्हणतात? जाणून घ्या सविस्तर

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय सध्या राजकारणातही मोठा इतिहास घडवताना दिसत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये त्याच्या (TVK) या पक्षाने आघाडी घेतल्याची चर्चा असून सत्तेपर्यंत त्याचा प्रवास जवळपास निश्चित मानला जात आहे. चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विजय आता प्रत्यक्ष राजकारणातही लोकांच्या आशा-अपेक्षांचे केंद्र बनला आहे. त्याच्या घरापासून ते चाहत्यांपर्यंत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
22 जून 1974 रोजी जोसेफ विजय चंद्रशेखर या नावाने जन्मलेला विजय आज अभिनेता, गायक, निर्माता आणि राजकारणी म्हणून ओळखला जातो. त्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. कारण त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी निगडीत राहिले आहे.
वडील – दिग्दर्शकाची मजबूत पायाभरणी
विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहेत. 1970-80 च्या दशकात त्याने अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनीच विजयला बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आणले आणि नालैया थीरपू या चित्रपटातून नायक म्हणून लॉन्च केले.
विजयची आई शोभा चंद्रशेखर या प्लेबॅक सिंगर, संगीत दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, विजयच्या कारकिर्दीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्या आजही विजयच्या राजकीय प्रवासात सक्रियपणे साथ देत आहेत.
थलापती या शब्दाचा अर्थ, नाव कसं पडलं?
थलापती हा तमिळ शब्द असून त्याचा अर्थ सेनापती, नेता किंवा कमांडर असा होतो. म्हणजेच लोकांना मार्गदर्शन करणारा पुढे नेणारा नेता. विजयच्या करिअरच्या सुरुवातीला त्याला फक्त विजय म्हणून ओळखलं जात होतं. पण 1990 च्या दशकाच्या शेवटी आणि 2000 नंतर त्याच्या चित्रपटांना प्रचंड यश मिळू लागलं. विशेषतः त्याच्या ॲक्शन चित्रपटांमधील दमदार, नेतृत्व करणाऱ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्याला थलापती म्हणायला सुरुवात केली.
हे नाव त्याला कोणत्याही एका चित्रपटातून अधिकृतपणे देण्यात आलं नाही तर चाहत्यांनी दिलेला किताब आहे. हळूहळू हेच नाव इतकं प्रसिद्ध झालं की आज त्याच्या नावापूर्वी थलापती लावणं हीच ओळख बनली आहे.
ब्रँड बनलेलं नाव
आज थलापती हे फक्त टोपणनाव नाही तर एक ब्रँड बनलं आहे. त्याच्या चित्रपटांच्या पोस्टर्सपासून ते राजकीय सभांपर्यंत सर्वत्र थलापती विजय असंच नाव वापरलं जातं. त्याच्या चाहत्यांसाठी तो केवळ अभिनेता नाही तर एक नेता देखील आहे.