Tanushree Dutta: “पाण्यात विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न” तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप

नव्या मुलाखतीत तनुश्री दत्ताचे धक्कादायक खुलासे

Tanushree Dutta: पाण्यात विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 22, 2022 | 8:08 PM

अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) 2020 मध्ये ‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ही MeToo मोहीम त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. कारण या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली. आता तनुश्रीने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, “अनेकदा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.” एकदा तनुश्री एका कार अपघातात गंभीर जखमी झाली होती. कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत देताना तनुश्रीने सांगितलं की, तिच्या पाण्यात काहीतरी मिसळून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

कार फोडल्याचा आरोप

उज्जैनमध्ये असताना तिच्या कारचं अनेकदा नुकसान करण्यात आलं असा खुलासा तिने केला. त्याच वेळी तिचा भीषण कार अपघातसुद्धा झाला होता. त्या अपघातात तनुश्रीला खूप दुखापत झाली होती आणि अनेक महिने ती अंथरुणावरच होती. तनुश्रीने सांगितलं की, अपघातानंतर बरं होण्यासाठी तिला बराच वेळ लागला. तनुश्रीने तिच्या या मुलाखतीदरम्यान बरेच आरोप केले. “माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, माझ्या पाण्यातही विष मिसळलं जात असल्याचं मला समजलं होतं. यासाठी माझ्या घरी प्लॅनिंग करुन एक घरकाम करणारी बाई पाठवण्यात आली होती. त्यानंतर मी आजारी पडू लागले होते. तेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळलं जात असल्याची मला खात्री पटली,” असं ती म्हणाली.

तनुश्रीने पुढे सांगितलं, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं. बॉलिवूड माफिया आणि आपल्या देशातील जुने आरोपी अशा कारवाया चालवतात आणि लोकांना त्रास दिला जातो. या सगळ्यामागे तेच लोक आहेत ज्यांची नावं मी MeToo मोहिमेअंतर्गत उघड केली होती.”

2 वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर ती बराच काळ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत प्रकरणाचा तपास केला. काही काळानंतर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतरही हा वाद बराच काळ चर्चेत होता. तनुश्रीवरून सुरू झालेला हा वाद मोठ्या सामाजिक मोहिमेचं रूप धारण करत होता. तनुश्रीसोबतच अनेक महिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते.