#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली

या प्रकरणी कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केलंय. यानंतर तनुश्री दत्ताचा संताप अनावर झाला आणि तिने पोलिसांना भ्रष्ट संबोधत राग व्यक्त केला.

#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळालाय. अभिनेत्री तनुश्री दत्ताने दहा वर्षांपूर्वी सिनेमाच्या सेटवर छेडछाड केल्याचा आरोप नानांवर केला होता. पण या प्रकरणी कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केलंय. यानंतर तनुश्री दत्ताचा संताप अनावर झाला आणि तिने पोलिसांना भ्रष्ट संबोधत राग व्यक्त केला.

“Horn ‘OK Pleassss” या सिनेमाच्या सेटवर दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी छेड काढली होती असा आरोप तनुश्री दत्ताने केला आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरु केला. पण त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

तनुश्री दत्ता भडकली

पोलिसांच्या या रिपोर्टनंतर तनुश्री दत्ताचा संताप झालाय. हा रिपोर्ट पाहून मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही. पोलिसांनी चुकीचे साक्षीदार पुढे केले. मी आता या सर्व गोष्टींना वैतागली असून इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. पण या एका उदाहरणावरुन कुणीही अन्याय सहन करु नये, त्याविरोधात आवाज उठवावा, असं आवाहनही तनुश्रीने केलंय.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी #MeToo या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण आणि छेडछाड झाल्याचे आरोप केले होते. यामध्ये बॉलिवूडमधील काही दिग्गज मंडळींवरही हे आरोप झाले. अनेक वर्षांनंतर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. अमेरिकेत राहत असलेली तनुश्री दत्ता भारतात आली आणि तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि कोर्टासमोर अहवाल सादर केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI