
या वर्षी ‘छोरी 2’ आणि ‘माँ’ चित्रपटाने धुमाकूळ घातला. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. दोन्ही चित्रपटांची चर्चा तेवढीच होती. आता या दोन चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये अजून एका चित्रपटाची चर्चा आहे. तो चित्रपट म्हणजे ‘चिमणी’. बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीच्या आगामी हॉरर थ्रिलर ‘चिमणी’ चा टीझर रिलीज झाला आहे, जो रहस्य, भीती आणि सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाची कथा देखील एका आई आणि मुलीची आहे. एक आई आपल्या मुलीला दुष्ट आत्म्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी कशी लढते त्यावर आधारित आहे.
आई-मुलीची कहाणी
‘चिमणी’ हा चित्रपट गगन पुरी दिग्दर्शित आणि शाह क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट निर्मित आहे.समीरा रेड्डी सोबत प्राची ठाकूर, शार्दुल राणा, आदित्य कुमार, प्रीती चौधरी आणि सौरभ अग्निहोत्री सारख्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट एका आईभोवती फिरतो जिच्या मुलीला एका पिशाच्चाने पछाडलेलं असतं आणि ती चंदेरी येथील एका शापित राजवाड्यात राहत असते. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
टीझर रिलीज
टीझर रिलीजबद्दल समीरा रेड्डी म्हणाली, ‘कालीच्या भूमिकेशी मी लगेच जोडले गेले कारण तिच्यात एक गूढ ऊर्जा आहे. या भूमिकेत मला आयुष्यातील तीन वेगवेगळे टप्पे साकारावे लागले – एक नववधू, एक आई आणि नंतर वयाच्या 60 व्या वर्षी… प्रत्येक टप्प्यात एक खोल अर्थ आहे आणि शूटिंग दरम्यान त्या प्रत्येक भूमिकेशी जुळवून घेणे एक आव्हान होते. परंतु मला या भूमिकेत उतरताना खूप मजा आली आणि मला वाटते की प्रेक्षकांना ते अत्यंत रोमांचक आणि भावनिक वाटेल.’
कास्टिंग कशी झाली?
दरम्यान, दिग्दर्शक गगन पुरी म्हणाले, ‘आम्ही कालीसाठी एक असा चेहरा शोधत होतो परिपक्व, दमदार आणि सामान्य वाटेल. कास्टिंग डायरेक्टरने समीराचे नाव सुचवले आणि सुरुवातीला आम्हाला वाटले की ती ही भूमिका साकारू शकेल का? पण नंतर मी तिचे एक इंस्टाग्राम रील पाहिले आणि मला वाटले की ती तिच्यासाठी परिपूर्ण आहे. लूक टेस्ट दरम्यान माझा आत्मविश्वास आणखी बळकट झाला. तिने अद्भुत काम केले आहे.’
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह निर्माण केला आहे. ‘चिमणी’ हा एक असा अनुभव ठरेल जो भीतीसोबतच हृदयालाही स्पर्श करेल.