तेजश्री प्रधानने ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिका अचानक सोडली? चर्चांना उधाण, अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता खुद्द तेजश्रीने उत्तर दिलं आहे. या मालिकेत तेजश्रीसोबतच सुबोध भावेची मुख्य भूमिका आहे.

तेजश्री प्रधानने वीण दोघातली ही तुटेना मालिका अचानक सोडली? चर्चांना उधाण, अभिनेत्रीने सोडलं मौन
तेजश्री प्रधान
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2025 | 3:17 PM

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारतेय. अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेला दमदार प्रतिसाद मिळतोय. यामध्ये तेजश्रीसोबत अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका आहे. स्वानंदी आणि समर यांची ही कथा प्रेक्षकांना भावतेय. मात्र अशातच तेजश्री ही मालिका सोडण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ. तेजश्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये ती एका सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तिच्या समोर काही कागदपत्रे असून एक व्यक्ती तिला काहीतरी समजावताना दिसत आहे. या व्हिडीओवर तिने ‘नवीन वेब सीरिज’ आणि ‘नवीन काम’ अशा आशयाचे हॅशटॅग्स दिले आहेत.

तेजश्रीने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं. नव्या वेब सीरिजच्या कामाची सुरुवात केली म्हणून तेजश्री मालिका सोडणार की काय, असा प्रश्न नेटकरी विचारू लागले. तेजश्रीने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली, म्हणजे ती मालिकेचा निरोप घेणार, असा अर्थ काहींनी काढला. या चर्चांमुळे अखेर तेजश्रीला स्पष्टीकरण द्यावं लागलं. तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित मालिका सोडणार की नाही, याचं उत्तर दिलं. ‘वीण दोघांतली ही तुटेना, ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही. झी मराठीशी असलेली ही वीण तुटणे नाही. लोभ असावा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. त्यामुळे तेजश्री या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत यापुढेही दिसून येईल, हे स्पष्ट झालं.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या लग्नसोहळा पहायला मिळतोय. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चुडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रेशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा आणि कौटुंबिक नात्यांच्या सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उघड होणारं सत्य कोणतं असेल आणि या घटनांनंतर नात्यांची वीण पुन्हा जुळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.